शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचे आमदार जयपूरहून मुंबईकडे रवाना?

शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीशिवाय बहुमताचा आकडा गाठू शकत नाही. त्यातच सत्तेपासून भाजपला दूर ठेवण्यासाठी तिन्ही पक्ष आता एकत्र येण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

SHARE

सत्तास्थापनेसाठी शिवसेना पाठिंबा देत नसल्यामुळे भाजपकडून आमदार भोडले जाऊ शकतात. या भितीने काँग्रेसने त्याच्या पक्षाच्या आमदारांना राजस्थानच्या जयपूर येथे हलवले. भाजप सत्तास्थापन करण्यात अपयशी ठरल्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेले बहुमत सिद्ध करण्यासाठी आमंत्रण दिले. मात्र शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीशिवाय बहुमताचा आकडा गाठू शकत नाही. त्यातच सत्तेपासून भाजपला दूर ठेवण्यासाठी तिन्ही पक्ष आता एकत्र येण्याच्या हालचालींना वेग आला असून काँग्रेसने पाठिंबा देण्यासाठी चार दिवसांपासून जयपूरला असलेल्या आमदारांना मुंबईकडे रवाना केलं आहे.

 गोवा आणि कर्नाटकप्रमाणे भाजपाकडून काँग्रेसच्या आमदार फोडले जातील या भीतीपोटी काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना आठ नोव्हेंबरपासून राजस्थान मध्ये ठेवले होते. आज त्यांना मुंबईत बोलावण्यात आले आहे. ऐनवेळी राज्यात कोणत्याही घडामोडी झाल्या तर आमदार मुंबईत असणार आहेत. काल राजस्थान मध्ये काँग्रेस आमदारांच्या बैठकीत काँग्रेसकडून शिवसेनेला थेट पाठिंबा द्यावा आणि काही आमदारांनी बाहेरून पाठिंबा द्यावा, असे मत व्यक्त केले होते. त्यासंदर्भातील आमदारांच्या सह्यांचे निवेदन राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काही ज्येष्ठ नेते आज सोनिया गांधी यांना दिल्लीत देणार असून त्यानंतर काँग्रेसची भूमिका ठरणार आहे. मात्र त्यापूर्वी मुंबईत कोणतीही अडचण होऊ नये म्हणून काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना बोलवले आहेत. दुसरीकडे मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक सुरू झाली असून त्यात पक्षाची भूमिका जाहीर केली जाणार आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत एकमत झाले आहे. मात्र काँग्रेसमधील एक गट शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबतच्या प्रस्तावाला विरोध करत आहे. मात्र तूर्तास तरी शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून दोन्ही पक्षात अनुकुल वातावरण आहे. मात्र दिल्लीतून आलेल्या काँग्रेसच्या निर्णयानंतरच राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुढील भूमिका स्पष्ठ केली जाईल असे राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

संबंधित विषय
ताज्या बातम्या