राष्ट्रपती पदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीतून क्रॉस व्होटिंग?

  Mumbai
  राष्ट्रपती पदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीतून क्रॉस व्होटिंग?
  मुंबई  -  

  येत्या 17 जुलैला होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे फटाके आधीच फुटायला लागले आहेत. त्यातच, एनडीएकडून राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून निवडलेल्या रामनाथ कोविंद यांना मुंबई भेटीत क्रॉस व्होटिंगचे गिफ्ट मिळणार आहे.

  आधीच दुबळे असणाऱ्या विरोधकांच्या गोटातील सुमारे 15 आमदार आपल्या संपर्कात असून राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणार असल्याची धक्कादायक माहिती अपक्ष आमदार रवी राणा यांनी `मुंबई लाइव्ह`ला दिली. त्यामुळे, कोविंद यांच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येलाच राजकीय वर्तुळात खळबळ माजणे स्वाभाविकच आहे.


  काँग्रेस- राष्ट्रवादीचे ते डझनभर आमदार कोण?

  6 अपक्ष आमदारही एनडीएचे राष्ट्रपती पदासाठीचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनाच मतदान करणार असल्याचेही रवी राणा यांनी 'मुंबई लाइव्ह'ला सांगितले. महाराष्ट्रात भाजपाकडे स्वतःची 122 आणि शिवसेनेची 63 आमदारांची मते आहेत. त्याबरोबरच, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनीही कोविंद यांना मतदान केल्यास विरोधक आणखीनच कमकुवत होण्याची भीती आहे.


  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामगिरीवर अपक्ष आमदार समाधानी आहेत. 6 अपक्ष आमदार हे कोविंद यांना मतदान करतील. एवढेच नाही तर, राष्ट्रवादीचे 6, आणि काँग्रेसचे 8 ते 9 आमदार आमच्या संपर्कात आहेत. आम्हाला राजकीय परिवर्तन घडवून आणायचे आहे. कोविंद यांच्या विजयामुळे हे नक्कीच शक्य आहे.


  रवी राणा, अपक्ष आमदार

  दरम्यान काँग्रेससारख्या मोठ्या पक्षाचे आमदार संपर्कात असल्याचे अपक्ष आमदार रवी राणा बोलतात, हीच मुळात हास्यास्पद गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली.


  रवी राणांसारख्या अपक्ष आमदारांचा हा दावाच हास्यास्पद आहे. आमची आणि भाजपाची विचारसरणी पूर्णपणे वेगळी असून, कोविंद यांना आमचे आमदार मतदान करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. राणांसारख्या अपक्ष आमदारांकडून उठवल्या जाणाऱ्या वावड्यांना आम्ही अजिबात महत्त्व देत नाही. आमच्या पक्षात भाजपासारखे आयाराम-गयाराम नाहीत.

  राजू वाघमारे, प्रवक्ते काँग्रेस


  हेही वाचा - 

  ज्याचं सरकार त्याचा रबर स्टॅम्प म्हणजे, 'राष्ट्रपती' - राज ठाकरे  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.