Advertisement

गॅस दरवाढीचा काँग्रेसकडून निषेध


गॅस दरवाढीचा काँग्रेसकडून निषेध
SHARES

धारावी - महागाईच्या आगीत होरपळून निघालेल्या जनतेसाठी दक्षिण मध्य मुंबई लोकसभा युवक काँग्रेसच्या वतीने मंगळवार 7 मार्चला केंद्र सरकारच्या विरोधात धारावीच्या स्थानिक आमदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली गॅस मोर्चा काढण्यात आला. या वेळी काँग्रेसचे मुंबई प्रभारी ऋत्विज जोशी, दक्षिण-मध्य जिल्हा अध्यक्ष हुकुमराज मेहता, काँग्रेस अध्यक्ष गणेश कुमार यादव, दक्षिण मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष अभिषेक सावंत, मुंबई महासचिव रितेश सावंत यांच्यासह काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोदी सरकार 'हाय हाय'चे नारे दिले.

गॅसच्या दरवाढीमुळे हैराण झालेल्या जनतेला राग दाबू नका व्यक्त करा असा संदेश आंदोलनकर्त्यांनी आपल्या भाषणातून दिला. या वेळी बोलताना स्थानिक आमदार वर्षा गायकवाड म्हणाल्या मोदी सरकारने सर्वसामान्य नागरिकांना अनेक स्वप्ने दाखविली. तीन वर्षात आम्हाला काय मिळाले? अन्न सुरक्षा कायद्यात गोंधळ, घासलेट 9 लिटर वरून 4 लिटरवर आले, टीव्ही जाहिरातींवर करोडोंनी पैसे उधळले, डाळ 40 रुपयांवरून 200 रुपयांवर नेली, नोटबंदी करून लघुउद्योजकांना देशोधडीला लावले, 414 रुपयाचा गॅस सिलेंडर 777वर नेवून ठेवला आणि आता तर चारवेळा बँकेतून पैसे काढल्यास आपले स्वतःचे पैसे काढण्यासाठी 150 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.

आज संपूर्ण देशात महिला सुरक्षा धोक्यात आहे, हेच काय अच्छे दिन? असा खरमरीत सवाल त्यांनी केला. गॅसचा भाव कमी झाला नाही, तर येणाऱ्या काही दिवसात संपूर्ण देशात मोदी सरकार विरोधात तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय काँग्रेस स्वस्थ बसणार नाही, असंही त्या म्हणाल्या.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा