Advertisement

भाजपाच्या नौटंकी आंदोलनात राम नाही तर झांसाराम- राम कदम

बुधवारी सकाळी ‘जन आक्रोश यात्रा’ काढणारे भाजपचे आमदार राम कदम यांना काँग्रेस सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी टोला हाणला आहे.

भाजपाच्या नौटंकी आंदोलनात राम नाही तर झांसाराम- राम कदम
SHARES

पालघर साधू हत्याकांड प्रकरणात भाजपाचे हितसंबंध असल्यानेच सीबीआय चौकशीची मागणी होत आहे. भाजपाच्या या नौटंकी आंदोलनात राम नाही तर झांसाराम आहे, असं म्हणत बुधवारी सकाळी ‘जन आक्रोश यात्रा’ काढणारे भाजपचे आमदार राम कदम यांना काँग्रेस सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी टोला हाणला आहे.

२१२ दिवस होऊनही पालघरमधील साधुंच्या हत्या प्रकरणातील गुन्हेगारांवर योग्य कारवाई होत नसल्याने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याच्या मागणीसाठी आमदार राम कदम त्यांचं खार येथील निवासस्थान ते पालघर अशी ‘जन आक्रोश यात्रा’ काढणार होते. यासाठी त्यांच्या निवासस्थान परिसरात मोठ्या प्रमाणात कार्यकर्तेही जमा झाले होते. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव आणि कायदा-सुव्यवस्था बिघडू नये यासाठी राम कदम यांनी हे आंदोलन करू नये अशी विनंती पोलिसांनी कदम यांना केली. तरीही पोलिसांचं न ऐकता घराबाहेर पडलेल्या राम कदम यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिलं.

हेही वाचा- भाजप नेते राम कदम पोलिसांच्या ताब्यात

त्यावर भाष्य करताना सचिन सावंत म्हणाले की, पालघर तालुक्यातील साधू हत्याकांडाची घटना अत्यंत दुर्दैवी होती. त्याचकरीता महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने याप्रकरणी अत्यंत कडक कारवाई केलेली आहे. एकंदर २२५ जणांना याप्रकरणात अटक करण्यात आलेली आहे. १५४ लोकांना हत्येच्या आरोपाखाली अटक झालेली आहे. ७५ लोकांना जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी अटक झालेली आहे. ज्या पोलिसांनी निष्काळजीपणा दाखवला होता, त्यांच्यावरही कारवाई करण्यात आलेली आहे. हे प्रकरण सीआयडीकडे सोपवण्यात आलं आहे. आता न्यायालयीन प्रक्रिया देखील सुरू आहे, अशी माहिती सचिन सावंत यांनी दिली.

असं असताना ६ महिन्यांनंतर भाजपकडून या प्रकारणाचं राजकारण करण्याचा जो प्रयत्न होतोय, हे अत्यंत दुर्दैवी आहे. खऱ्या अर्थाने ज्या गडचिंचले गावात हे हत्याकांड झालं, ते गाव भाजपचा गड म्हणून ओळखलं जातं. १० वर्षांपासून भाजपचा (bjp) सरपंच तिथं आहे. बहुसंख्य कार्यकर्ते भाजपशी जोडलेले आहेत. आरोपी क्रमांक १ ते ६५ या दरम्यान जेवढे अटक झालेले आरोपी बहुसंख्य भाजपशी संबंधित आहेत. 

या प्रकरणातून भाजपच्या कार्यकर्त्यांना सोडवण्यासाठीच सीबीआयची मागणी केली जात आहे. उत्तर प्रदेशात झालेल्या साधू हत्या प्रकरणात, कर्नाटकातील पुजाऱ्यांच्या हत्या प्रकरणात भाजप काही बोलायला तयार नाही. साधू, धर्म, मंदिराच्या प्रश्नावर भाजप जे काही राजकारण करतंय ते अत्यंत हीन आहे, असा आरोप देखील सचिन सावंत यांनी केला.

(congress spokesperson sachin sawant slams bjp mla ram kadam over palghar mob lynching case)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा