Advertisement

लता दीदींच्या स्मारकासाठी काँग्रेस-भाजप आग्रही, पण...

सोमवारी भाजप आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली. शिवाय कॉंग्रेसनही स्मारकाची मागणी केली. यावर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी 'स्मारकाबाबत राजकारण करू नये', असं म्हटलं.

लता दीदींच्या स्मारकासाठी काँग्रेस-भाजप आग्रही, पण...
SHARES

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर त्यांच्यावर दादरमधील शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्कारानंतर लतादीदींचे शिवाजी पार्क इथं स्मारक उभारावं अशी मागणी केली जात आहे. यांसदर्भात सोमवारी भाजप आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली. शिवाय कॉंग्रेसनही स्मारकाची मागणी केली. यावर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी 'स्मारकाबाबत राजकारण करू नये', असं म्हटलं.

शिवाजी पार्क येथे लतादीदींचे भव्य स्मारक उभारण्याची मागणी भाजपचे आमदार राम कदम यांनी केली आहे, तर स्मारकाबाबत राजकारण करू नये, असे आवाहन करतानाच लतादीदींच्या स्मारकाबाबत केंद्र सरकारनेच विचार केला पाहिजे, असे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी म्हटलं.

शिवाजी पार्क येथे लतादीदींचे भव्य स्मारक उभारण्याची मागणी राम कदम यांनी केली आहे. राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविल्याचेही सांगितले आहे. 'जिथे दीदींवर अंत्यसंस्कार झाले, त्या पंचतत्त्वात विलीन झाल्या, त्याच जागेवर स्मृतिस्थळ उभारायला हवे. तिथे जगाला प्रेरणा देईल, असे आंतराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हायला हवे, अशी करोडो देशवासीयांची भावना असल्याचेही ते म्हणाले. त्याचा सन्मान करून सरकारने तातडीने स्मारकाचे काम सुरू करावे', अशी मागणीही कदम यांनी केली.

काँग्रेसनेही या मागणीला एका अर्थाने पाठिंबा दिला आहे. लतादीदी यांचे स्मारक हे शिवाजी पार्कमध्येच व्हायला हवे, तेसुद्धा आंतराष्ट्रीय दर्जाचे असायला हवे. देशातून व जगातून येणाऱ्या लोकांना लतादीदींच्या स्मारकाला भेट दिल्यानंतर त्यांचा गोड आवाज स्मरायला हवा. कालच्या, आजच्या व उद्याच्या पिढीला स्मरणात राहील, अशा दर्जाचे स्मारक शिवाजी पार्कमध्ये व्हावे, ही काँग्रेसची भूमिका असल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी हा विषय केंद्र सरकारकडे ढकलण्याचा प्रयत्न केला. लतादीदी या महान होत्या. आपल्या भूमीत त्यांनी जन्म घेतला, महाराष्ट्राशी त्यांचे नाते आहे. त्या शरीराने गेल्या. आत्मा आपल्याकडे आहे. त्या अमर राहतील. काही लोक त्यांच्या स्मारकाबाबत बोलत आहेत. त्यांचे स्मारक बनिवणे सोपे नाही. त्यासाठी केंद्र सरकारने विचार करायला हवा. दीदींच्या स्मारकाबाबत देशाला विचार करावा लागेल, असे राऊत म्हणाले.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा