Advertisement

हे तर राज्याच्या गुप्तचर यंत्रणेचं अपयश, वांद्र्यातील घटनेवरून राणेंचा प्रहार

संचारबंदीतही एवढ्या मोठ्या संख्येने लोकं जमणं हे राज्याच्या गुप्तचर यंत्रणेचं अपयश असल्याचा घणाघात माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे (bjp mp narayan rane) यांनी सरकारवर केला.

हे तर राज्याच्या गुप्तचर यंत्रणेचं अपयश, वांद्र्यातील घटनेवरून राणेंचा प्रहार
SHARES

राज्यात लॉकडाऊन (lockdown) असताना, जमावबंदी आदेश लागू असताना वांद्र्यात (Bandra incidence) हजारोंच्या संख्येने लोकं जमलेच कसे? तब्बल ३ ते ४ हजार लोकं जमेपर्यंत सरकार काय वाट बघत होतं का? संचारबंदीतही एवढ्या मोठ्या संख्येने लोकं जमणं हे राज्याच्या गुप्तचर यंत्रणेचं अपयश असल्याचा घणाघात माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे (bjp mp narayan rane) यांनी सरकारवर केला.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना कोरोनामुळे वांद्र्यात निर्माण झालेल्या परिस्थितीवरून नारायण राणे यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं तसंच कोरोनाचा सामना करण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याने  केंद्र सरकारने राज्यात तातडीने लष्कराला (army) बोलावून राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखावा, अशी मागणी देखील राणे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

हेही वाचा- वांद्र्यातील गर्दीवर चर्चेची गुऱ्हाळं, मग, सूरतच्या उद्रेकाचं काय? शिवसेनेचा सवाल

गर्दी जमतेच कशी ?

वांद्र्यातील घटनेविषयी बोलताना ते म्हणाले, लॉकडाऊन असताना वांद्र्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक जमतातच कसे? ३-४ हजार लोकं जमेपर्यंत सरकार वाट बघत होतं का? राज्याची गुप्तचर (maharashtra intelligence bureau) यंत्रणा काय करत होती? जमावबंदी कायदा लागू असताना एवढ्या मोठ्या संख्येने लोकं जमा होणं हे सरकारचं अपयश आहे. गुजरातमध्येही लोकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. ते सुद्धा चुकीचंच होतं. पण गुजरात सरकारला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश आल्याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.

लष्कराला बोलवा

महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणा चांगली आहे. तरीही राज्य सरकार कोरोनाचा सामना करण्यात अपयशी ठरलं आहे. कोरोनाबाधितांवर योग्य उपचार होताना दिसत नाहीत. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ३ हजाराच्यावर गेली. तर मृतांची संख्या देखील वाढली आहे. 

अन्य राज्यांच्या तुलनेत अपयश

कोरोनाचा सामना करण्यासाठी केरळ, उत्तर प्रदेश, राजस्थानसारख्या राज्यांनी योग्य त्या उपाययोजना केल्या. मात्र जिथं कोरोना रुग्ण आढळले तिथं महाराष्ट्राला योग्य उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. महाराष्ट्रात लोकं लॉकडाऊनचं काटेकोरपणे पालन करत नसल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लष्कर आणि होमगार्डला पाचारण करावं, अशी मागणी नारायण राणे यांनी केली. 

हेही वाचा- परप्रांतीय मजुरांना घरी पाठवण्याबद्दल काय? उच्च न्यायालयाची सरकारला विचारणा

महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे. देशाच्या उत्पन्नापैकी ३३ टक्के उत्पन्न महाराष्ट्रातून जातं. कोरोनाच्या संकटामुळे महाराष्ट्राच्या प्रगतीला खिळ बसणार आहे. यामुळे राज्याचं आणि पर्यायानं देशाचं मोठं नुकसान होणार आहे. म्हणून तज्ज्ञांचा सल्ला घेऊन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियोजनातील त्रुटीही सरकारने दूर करायला हव्यात, अशा सूचनाही राणे यांनी केल्या.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा