Advertisement

ग्रीन, ऑरेंज झोनमधील उद्योगधंद्यांना माफक परवानगी, मात्र जिल्हाबंदी कायम- मुख्यमंत्री

ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील उद्योगधंद्यांना माफक स्वरूपात परवानगी देण्याचं राज्य सरकारने ठरवलं आहे. परंतु एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यास कुणालाही परवानगी देण्यात आलेली नाही.

ग्रीन, ऑरेंज झोनमधील उद्योगधंद्यांना माफक परवानगी, मात्र जिल्हाबंदी कायम- मुख्यमंत्री
SHARES

लॉकडाऊनच्या काळात राज्यातील उद्योगधंद्यावर परिणाम झाला आहे. याकडे वेळीच लक्ष नाही दिलं, तर कोरोनाच्या संकटातून बाहेर पडून आपण आर्थिक संकटात पडू. त्यामुळेच राज्यातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी, ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील उद्योगधंद्यांना माफक स्वरूपात परवानगी देण्याचं राज्य सरकारने ठरवलं आहे. परंतु एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यास कुणालाही परवानगी देण्यात आलेली नाही. ३ मेपर्यंत ही बंदी कायम असेल, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियावरून दिली.

‘या’ झोनमध्ये परवानगी

राज्यातील कोरोना आणि आर्थिक समस्येविषयी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यात लॉकडाऊन जाहीर होऊन उद्या ६ आठवडे पूर्ण होत आहेत. गेल्या महिन्यात २० तारखेला सर्व ठप्प झालं होतं. आपलं अर्थचक्र त्यानंतर कोरोनाच्या संकटात रुतलं. हे अर्थचक्र फिरलंच पाहिजे. त्यासाठी उद्यापासून काही ठिकाणी आपल्याला गणपती बाप्पा मोरया म्हणावंच लागेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण राज्यात रेड, आॅरेंज आणि ग्रीन असे ३ झोन तयार केले आहेत. त्यापैकी ग्रीन झोनमध्ये एकही कोरोना रुग्ण आढळलेला नाही आणि ऑरेंज झोनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने या २ झोननमध्ये माफक प्रमाणात उद्योग सुरू करण्यास परवानगी देण्यात येत आहे. 

हेही वाचा - चिंता नको! महाराष्ट्र सरकार तुम्हाला घरापर्यंत नेऊन सोडेल, उद्धव ठाकरेंचं परप्रांतीय मजुरांना आश्वासन

मालकांनी घ्यावी काळजी

या ठिकाणच्या उद्योगांना आवश्यक असलेला सर्व कच्चा माल पोहोचवण्याची जबाबदारी सरकार घेईल, मात्र कामगारांची सोय ही मालकांनाच करावी लागेल. कोणत्याही स्वरुपात मजुरांना प्रवास करावा लागणार नाही याची काळजी मालकांना घ्यावी लागेल. या काळात जिल्ह्यांच्या वेशी या बंदच राहणार असल्यामुळे नागरिकांना या काळात बाहेर पडता येणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले.

वाहतुकीला जिल्हाबंदी कायम

जिल्हा अंतर्गत मालवाहतूक सुरू राहील, मात्र मला व्हायरसची वाहतूक करायची नाही. कोणताही धोका पत्करायचा नाही. त्यामुळे दोन जिल्ह्यांमध्ये मालवाहतूक करता येणार नाही. तसंच सर्वसामान्यांसाठीही जिल्हाबंदी कायम राहणार आहे. ३ मेपर्यंत ही बंदी कायम असेल. या काळात महाराष्ट्रात रेल्वे आणि विमान सेवा सुरू होणार नाही. लॉकडाऊनचे नियम सर्वांना पाळायचे आहेत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

मुंबई-पुणे हे रेड झोनमध्ये असल्याने या ठिकाणी वृत्तपत्रं वितरणावर आणि स्टॉल्सवर ठेवण्यावर बंदी नाही. पण घरोघरी जावून वृत्तपत्रं टाकणं योग्य नाही. माझी भीती अनाठायी असेलही. मात्र आरोग्यविषयक आणीबाणीच्या काळात मला हा धोका पत्करायचा नाही, असंही त्यांनी सांगितलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा