Advertisement

चिंता नको! महाराष्ट्र सरकार तुम्हाला घरापर्यंत नेऊन सोडेल, उद्धव ठाकरेंचं परप्रांतीय मजुरांना आश्वासन

ज्या दिवशी केंद्र सरकारकडून परवानगी मिळेल, तेव्हा महाराष्ट्र सरकार तुम्हाला तुमच्या घरपर्यंत नेऊन सोडण्याची व्यवस्था करेल, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना दिलं.

चिंता नको! महाराष्ट्र सरकार तुम्हाला घरापर्यंत नेऊन सोडेल, उद्धव ठाकरेंचं परप्रांतीय मजुरांना आश्वासन
SHARES

लाॅकडाऊनमुळे महाराष्ट्रात काम करत असलेले परप्रांतीय ठिकठिकाणी अडकून पडले आहेत. लाॅकडाऊन कधी एकदाचं संपतय आणि आपण आपल्या गावी जातोय, असं त्यांना झालं आहे. अशा परप्रांतीयांना उद्देशून बोलताना तुम्ही चिंता करू नका, ज्या दिवशी केंद्र सरकारकडून परवानगी मिळेल, तेव्हा महाराष्ट्र सरकार तुम्हाला तुमच्या घरपर्यंत नेऊन सोडण्याची व्यवस्था करेल, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना दिलं. रविवार १९ एप्रिल रोजी सोशल मीडियाद्वारे जनतेशी संवाद साधताना उद्धव ठाकरे बोलत होते.

मजुरांचे हाल

लाॅकडाऊनमुळे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात परप्रांतीय कामगार अडकून पडले आहेत. राज्यातील उद्योगधंदे बंद असल्याने त्यांना कुठलाही रोजगार उरलेला नाही.परिणामी हातावर पोट असलेल्या मजुरांचे चांगलेच हाल होत आहेत. खिशात पैसे नसल्याने अनेकांचे तर खाण्यापिण्याची आबाळ होऊ लागली आहे. त्यामुळे पायी चालत, सायकलने किंवा कुठल्याही टेम्पो, ट्रकमधून बेकायदेशीरपणे बसून आपल्या गावी जाण्याचा प्रयत्न या परप्रांतीयांनी करून पाहिला. परंतु राज्यात नाक्यानाक्यावर पोलीस बंदोबस्त असल्याने बहुसंख्य लोकांचा हा प्रयत्न फसला. राज्य सरकारने या सर्व परप्रांतीय मजुरांची जबाबदारी स्वीकारत त्यांच्यासाठी ६ हजारहून अधिक ठिकाणी कॅम्प उभारून त्यांच्या तीन वेळच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. तर नोंदणीकृत बांधकाम कामगारांना प्रत्येकी २ हजार रुपये देण्याची व्यवस्थाही शासनाने केली आहे. 

हेही वाचा- बांधकाम मजुरांना मिळणार २ हजारांची मदत, राज्य सरकारचा निर्णय

उद्योगधंदे सुरू होतील

अशा परप्रांतीयांना दिलासा देण्यासाठी उद्धव ठाकरे त्यांना संबोधून म्हणाले, तुम्ही शांत राहण्याचं धोरणं स्वीकारल्याने शासनाला सहकार्य होत आहे. आमची केंद्र शासनासोबत सातत्याने चर्चा सुरू आहे. मला पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या दिवसांमध्ये काही ना काही मार्ग यातून नक्की निघेन. तुम्ही बिलकूल चिंता करू नका कारण महाराष्ट्रात हळुहळू आपण उद्योगधंदे सुरू करत आहोत. शक्य असल्यास तुम्ही कामावर परतू शकता. तुमची रोजीरोटी सुरूच राहील आणि मी तुम्हाला वचन देतो की ज्या दिवशी हे लाॅकडाऊन संपेल, त्या दिवशी महाराष्ट्र सरकार तुम्हाला तुमच्या घरापर्यंत नेऊन सोडेन. 

घाबरून जाऊ नका

तुम्ही इथं आहात, तुमचं कुटुंब तिथं आहे. ही नक्कीच चांगली गोष्ट नाही. तुम्ही घाबरलेले आहात, ते घाबरलेले आहेत. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की तुम्ही जेव्हा आपल्या घरी जाल तेव्हा आनंदात जा, घाबरून जाऊ नका. तोपर्यंत तुम्ही आपल्या कुटुंबाला सांगा की मी महाराष्ट्रात व्यवस्थित आहे. इथलं सरकार आमची काळजी घेतंय. तशीच काळजी तिथलं सरकार देखील घेत आहे. त्यामुळे सर्वांनीच सुरक्षित राहा. मला नक्कीच विश्वास आहे की हे दिवस सुद्धा निघून जातील आणि पुन्हा आनंदाचे दिवस येतील, अशा शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी सगळ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा