पोलीस, डाॅक्टरांचा पगार कापण्यापेक्षा आमदारांचा १०० टक्के पगार कापा- नितेश राणे

इतक्या कठीण प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून कोरोनाशी मुकाबला करणारे डाॅक्टर्स आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा पगार कापण्याऐवजी आमदारांचा १०० टक्के पगार कापा, असा सल्ला भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.

पोलीस, डाॅक्टरांचा पगार कापण्यापेक्षा आमदारांचा १०० टक्के पगार कापा- नितेश राणे
SHARES

कोरोना संकटाच्या पाठोपाठ राज्यावर आर्थिक संकटाचेही वारे वाहू लागले आहेत. या काळात सरकारी तिजोरी शाबूत ठेवण्यासाठी राज्य सरकारने उपाययोजना करण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार शासनाने सर्व लोकप्रतिनिधी आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात ६० टक्क्यांपर्यंत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु इतक्या कठीण प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून कोरोनाशी मुकाबला करणारे डाॅक्टर्स आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा पगार कापण्याऐवजी आमदारांचा १०० टक्के पगार कापा, असा सल्ला भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. 

काय आहे निर्णय?

कोरोनाच्या पाठोपाठ उद्धवणाऱ्या आर्थिक कोंडीवर मात करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून, विधिमंडळाचे सर्व सदस्य तसंच स्थानिक स्वराज संस्थांच्या सदस्यांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधींच्या मार्च महिन्याच्या वेतनात ६० टक्के कपात (salary cut of mla and corporator) करुन त्यांना ४० टक्के वेतन देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 

 हेही वाचा - ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, मुख्यमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधींचं ६० टक्के वेतन कापणार

त्याचबरोबर ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या (government employees) वेतनात ५० टक्के, तर ‘क’ वर्ग कर्मचाऱ्यांच्या वेतनात २५ टक्के कपात करण्यात येणार आहे. मात्र, ‘ड’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात करण्यात येणार नाही. राज्य शासकीय अधिकारी-कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली. 

पगार वाढवून द्या

परंतु या वेतन कपातीवर नितेश राणे यांनी आक्षेप घेतला आहे. महाराष्ट्र सरकार पोलीस आणि आरोग्य विभागाच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांचा पगार का कापत आहे ? हे लोक जीव धोक्यात घालून आपल्यासाठी अतिरिक्त काम करत आहेत. हवं असेल तर आम्हा आमदारांचा १०० टक्के पगार कापा..पण पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा पगार कापू नका. उलट त्यांना पगार वाढवून द्या”.

“ही वेळ त्यांचं खच्चीकरण करण्याची नसून मनोधैर्य वाढवण्याची  आहे. ते आपल्यासाठी जीव धोक्यात घालत आहे. आपण किमान त्यांच्या कुटुंबाची तरी योग्य काळजी घेतली पाहिजे. मला अनेक पोलीस कर्मचारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे संदेश येत आहेत. ही वेळ त्यांना त्रास देण्याची नाही”, असं नितेश राणे यांनी आपल्या ट्विटर हँडवर लिहिलेल्या मेसेजमध्ये म्हटलं आहे. 

 हेही वाचा - राज्यात मोठं आर्थिक संकट, ताबडतोब २५ हजार कोटींचं पॅकेज द्या- अजित पवार

अफवा पसरवू नका

दरम्यान, वेतन कपातीमध्ये आरोग्य, पोलीस व कोरोनाशी संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश नाही. त्यामुळे या विभागातील कर्मचाऱ्यांनी काहीही काळजी करु नये. याबाबत अजितदादा स्पष्टीकरण देतीलच, असं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विटमधून सांगितलं आहे. यावेळी त्यांनी कुणीही उगाच अफवा पसरवू नये असं आवाहनही केलं आहे.


संबंधित विषय