Advertisement

राज ठाकरेंची सूचना वास्तववादी, छगन भुजबळांचंही समर्थन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वाईन शाॅप आणि हाॅटेल सुरू करण्याची सरकारला केलेली सूचना ही वास्तववादी आणि राजकारणापलिकडची असल्याचं म्हणत राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज यांच्या भूमिकेला एकप्रकारे समर्थच दिलं.

राज ठाकरेंची सूचना वास्तववादी, छगन भुजबळांचंही समर्थन
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वाईन शाॅप आणि हाॅटेल सुरू करण्याची सरकारला केलेली सूचना ही वास्तववादी आणि राजकारणापलिकडची असल्याचं म्हणत राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज यांच्या भूमिकेला एकप्रकारे समर्थच दिलं आहे. एवढंच नाही तर राज्याला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवायचं असेल, तर सरकारने स्वत:चे उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण केले पाहिजेत, असा सल्लाही दिला आहे. 

उत्पन्नाचे मार्ग शोधावे लागतील

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत छगन भुजबळ यांनी राज ठाकरे यांनी केलेल्या सूचनेवर मत प्रदर्शन केलं. ते म्हणाले, राज ठाकरे यांनी केलेली मद्य विक्रीची सूचना वास्तविक आणि राजकारणापलिकडची आहे. मद्य विक्रीसोबतच महसुलाचे इतर पर्याय सुरू होणंही आवश्यक आहे. पेट्रोल-डिझेल, स्टॅम्प ड्युटी इथून मिळणारा महसूल बंद झाला आहे. त्यामुळे उत्पन्नाचे मार्ग हळूहळू खुले करावेच लागतील. एकट्या महाराष्ट्रालाच नाही, तर सगळ्याच राज्यांना हा निर्णय घ्यावा लागेल, असं भुजबळ यांनी सांगितलं.

हेही वाचा - राज ठाकरेंचा सल्ला केंद्राने ऐकला? गृह मंत्रालयाने दिली ‘ही’ दुकानं उघडायला परवानगी

केंद्राकडून भरघोस मदत नाही

लाॅकडाऊनमुळे महाराष्ट्रातील तमाम उद्याेगधंदे ठप्प झाल्याने राज्याच्या अर्थव्यवस्थेला त्याचा फटका बसला आहे. याउलट आरोग्य आणि गरजूंसाठी सुरू केलेल्या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात निधी खर्च होत आहे. तीन राज्यांच्या एकत्रित जीएसटीएवढा जीएसटी एकट्या महाराष्ट्रातून जमा होतो. तरीही अत्यंत कमी परतावा महाराष्ट्राला मिळतो. सीएसटीची थकबाकी अजूनही महाराष्ट्राला मिळालेली नाही. केंद्रानं दिलेल्या तांदळापासून केशरी कार्ड धारकांना वंचित राहावा लागलं आहे. खरंतर आताच्या काळात केंद्र सरकारने भरघोस मदत करायला हवी होती, पण तसं होत नाहीय, असं भुजबळ म्हणाले.

दुकाने उघडण्यास परवानगी

त्यामुळे सरकारने काही अटी-शर्थींसह कोरोना हाॅटस्पाॅट नसलेल्या नागरी भागातील दुकानं उघडण्यास परवानगी दिली आहे. कोरोना कधीपर्यंत थांबेल हे कुणालाही सांगता येत नाही. फक्त जीवनावश्यक वस्तू पुरवल्या म्हणजे झालं असं होत नाही. लोकांना घरात इतरही गोष्टी लागतातच. त्या मिळाल्या नाहीत, तर त्यांची मोठी अडचण होते, ही अडचण समजून घेतली पाहिजे, असं सांगत त्यांनी सरकारकडून सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा