कोरोना विषाणूच्या (coronavirus) पार्श्वभूमीवर आर्थिक अडचणीत सापडलेल्या सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने रेशन दुकानांच्या माध्यमातून स्वस्त दरांत धान्य उपलब्ध करून देण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली. केंद्राकडून धान्य मिळूनही लाभार्थ्यांपर्यंत हे धान्य का पोहोचलेलं नाही, केशरी रेशन कार्ड असलेल्या ग्राहकांना स्वस्त धान्य का मिळत नाही? असे अनेक प्रश्न सध्या राज्यातील जनतेकडून सरकारला विचारले जात आहेत. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm uddhav thackeray) यांनी बुधवारी राज्यातील जनतेशी सोशल मीडियावरून संवाद साधताना खुलासा केला.
केंद्राचं आपल्याला उत्तम सहकार्य आहे पण केंद्राने जी योजना दिली आहे त्यात फक्त तांदूळ आहे ज्याच वाटप सुरू झालेलं आहे. आणि ही योजना अन्न व्यवस्थेतील लाभार्थ्यांसाठी आहे म्हणजे केशरी कार्ड वाल्यांसाठी नाही आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 8, 2020
हेही वाचा- केशरी रेशन कार्डधारकांनाही मिळेल सवलतीच्या दरात धान्य, मंत्रिमंडळाचा निर्णय
तांदळाचं वाटप
उद्धव ठाकरे (Cm uddhav thackeray) म्हणाले, केंद्र सरकारकडून धान्य पुरवठा होऊनही तुम्ही ते वाटत का नाहीत? केशरी रेशन कार्ड असणाऱ्या मध्यमवर्गीयांचं काय? असे अनेक प्रश्न मला विचारण्यात येत आहेत. त्यावर मी सगळ्यांना सांगू इच्छितो की, केंद्र सरकारकडून आपल्याला धान्य मिळतंय. केंद्राचं आपल्याला उत्तम सहकार्य देखील आहे. परंतु केंद्राच्या योजनेतून फक्त तांदूळच (rice and wheat) आपल्याला मिळत आहे. ज्याचं वाटप मागील २ ते ४ दिवसांपासून सुरू देखील झालं आहे. परंतु हे धान्य केंद्राच्या अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांसाठीच आहे, ते केशरी कार्डधारकांसाठी नाहीय.
मध्यमवर्गीयांसाठी काय?
त्यामुळे मी २ दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांना स्वत: फोन करून तसंच पत्र लिहून विनंती केली आहे की, ज्या मध्यम वर्गीयांचं उत्पन्न शहरी भागात मासिक साधारणत: ५०-६० हजार ते १ लाख आणि ग्रामीण भागात ४०-४४ हजार ते १ लाख या दरम्यान आहे, त्यांच्यासाठी देखील वेगळी योजना राबवली पाहिजे. त्यांनी मी असंही सांगितलं की केंद्राने आम्हाला आधारभूत किंमतीवर धान्य पुरवलं तरी ते आम्ही त्यांना वाटू.
जे केशरी रेशन कार्ड वाले आहेत, त्यांना आपण ३ किलो गहू ₹८ प्रतिकीलो दराने आणि २ किलो तांदूळ ₹१२ प्रतिकिलो दराने आपण त्यांना उपलब्ध करून देत आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 8, 2020
हेही वाचा- भाजप नेते किरीट सोमय्या पोलिसांच्या ताब्यात, हे आहे कारण
इतकं धान्य मिळेल
त्यानुसार मध्यम वर्गीय केशरी रेशन कार्डधारकांना प्रति व्यक्ती ३ किलो गहू ८ रुपये किलो दराने आणि प्रति व्यक्ती २ किलो तांदूळ १२ रुपये किलो दराने देण्यासंदर्भातील निर्णय राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.
केंद्र सरकारची योजना ही अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांसाठीच आहे. त्यामुळे केंद्राने दिलेलं धान्य महाराष्ट्र सरकार वाटत का नाही? असा गैरसमज करून घेऊ नका, असं आवाहन देखील उद्धव ठाकरे यांनी केलं.