Advertisement

लाॅकडाऊनवर सस्पेन्स कायम, पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना केल्या 'या' सूचना

३ मे नंतर लाॅकडाऊन उठवण्यासारखी परिस्थिती देशात नसल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी नोंदवलं.

लाॅकडाऊनवर सस्पेन्स कायम, पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना केल्या 'या' सूचना
SHARES

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवार २७ एप्रिल रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत व्हिडिओ काॅन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. याबैठकीत ३ मे नंतर लॉकडाऊन वाढवायचं की नाही याचा निर्णय झालेला नसला, तरी ३ मे नंतर लाॅकडाऊन उठवण्यासारखी परिस्थिती देशात नसल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी नोंदवलं. त्यामुळे लाॅकडाऊनवरील प्रश्नचिन्ह कायम राहणार आहे.   

कोरोनाला थोपवून धरलं

यावेळी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना उद्देशून पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कोरोना जगभर पसरण्यास सुरूवात झाली तेव्हा चीन वगळता भारतासोबत इतर २० देश होते, ज्यांच्या देशात कोरोना पसरू लागला होता. पण आज ७ ते ८ आठवड्यानी भारताच्या तुलनेत या देशांमध्ये १०० पट जास्त लोकसंख्या कोरोनाने संक्रमित झाली आहे. तर कितीतरी लोकांचा मृत्यू झाला आहे. भारताने योग्य वेळी लॉकडाऊनचा निर्णय घेतल्याने तसंच राज्यांनी लाॅकडाऊनची चांगली अंमलबजावणी केल्याने कोरोनाला आपण बऱ्यापैकी थोपवून धरलं आहे. यांत जनतेची साथ देखील मोलाची ठरली. 

हेही वाचा- महाराष्ट्राला अतिरिक्त अनुदान द्या, शरद पवारांची केंद्राकडे मागणी

स्थितीनुसार धोरणे ठरवा

असं असलं, तरी अजून भारतावरचं संकट टळलेलं नाही. पहिला २१ दिवसांचा लॉकडाऊन आणि नंतरचा दुसऱ्या टप्प्यातील काही प्रमाणात शिथिल केलेला लॉकडाऊन या दोन्ही अनुभवांच्या आधारे आपल्याला पुढं जायचं आहे. लॉकडाऊन कुठे कडक आणि कुठे शिथिल करायचे याचा निर्णय प्रत्येक राज्याने विचार करून घ्यावा. कोरोना दीर्घ काळासाठी आपल्यात राहणार आहे, हे समजून राज्याने लॉकडाऊनमध्येही जीवन सुरळीत राहील यानुसार आपली धोरणे ठरवली पाहिजे. कारण कोरोनाचा मुकाबला करताना आपल्याला आर्थिक व्यवहारही गतीने सुरु करायचे आहेत. ज्या क्षेत्रांमध्ये कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव आहे तिथं अर्थातच आर्थिक नुकसानही जास्त होणार. २० एप्रिलनंतर आपण काही ठिकाणी शिथिलता आणली, पण त्यामुळे आपलं आव्हानही वाढलं आहे.

रेड झोनमधून बाहेर पडण्यासाठी

३ मे रोजी दुसरा लॉकडाऊन संपणार असला, तरी विशेषत: रेड आणि ऑरेंज झोनमध्ये अतिशय काळजी घेण्याची आणि काटेकोर उपाययोजनांची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे. संक्रमण क्षेत्रांची संख्या वाढणार नाही याचा आटोकाट प्रयत्न करावा लागेल. त्यासाठी जे जे काही करणे आवश्यक आहे ते करा. पुढे चालून रेड, ऑरेंज, ग्रीन झोननिहाय लॉकडाऊनबाबत प्रत्येक राज्यांना धोरण ठरवावं लागेल. रेड झोनमधून ऑरेंज आणि ऑरेंजमधून ग्रीन झोनमध्ये कसं जायचं याचा नियोजन आवश्यक आहे. मोठ्या शहरांत रेड झोन्स आहेत. पण उर्वरित ठिकाणी ते पसरणार नाहीत याची काळजी घेणं गरजेचं आहे. या सर्व रेड झोन्सचं व्यवस्थित विश्लेषण आणि मूल्यांकन करा. संक्रमित व्यक्तींचे जास्तात जास्त संपर्क तपासा.  कुठली वाहतूक सुरु राहील, ज्येष्ठांनी घराबाहेर पडावे का नाही, दुकाने कशी सुरु राहतील इत्यादी.

हेही वाचा- मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीसाठी खटपट, मंत्रिमंडळ बैठकीत सुधारीत प्रस्ताव आणणार?

नवीन नियम बनवा 

जुने आणि किचकट नियम बदलण्याची सुधारणा घडवण्याची हीच सुवर्णसंधी आहे, ती गमावू नका. प्रत्येक राज्याने रिफॉर्म्सवर लक्ष द्या. संकटाला संधीत बदला. तंत्रज्ञानाचा खूप उपयोग होऊ शकतो. त्याकडे लक्ष द्या.

ज्या राज्यांत कोरोनाचा आकडा वाढतोय ती राज्ये गुन्हेगार आहेत असं नाही. आकड्यांचा दबाव घेऊ नका. भयभीत होऊ नका. अशा राज्यांनी खाली मान घालण्याची गरज नाही. ज्या राज्यांमध्ये आकडे कमी आहेत म्हणजे काही ती महान  आहेत, असा अर्थ होत नाही. आपण सगळे एकाच संकटातून जात आहोत. काहीही लपवू नका.  

कोरोनशिवाय जे इतर आजारांचे रुग्ण आहेत, त्यांना योग्य उपचार मिळालेच पाहिजेत. यात ढिलाई नको. आपली परंपरागत वैद्यकीय व्यवस्था सुरु राहिलीच पाहिजे. डॉक्टरांनी दवाखाने सुरु केलेच पाहिजेत, याकडे कटाक्षाने लक्ष द्या, असंही पंतप्रधान म्हणाले.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा