Advertisement

राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, आमदार-खासदारांचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देणार

राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या सर्व आमदार आणि खासदारांच्या एका महिन्याचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोशल मीडियावरून दिली आहे.

राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, आमदार-खासदारांचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देणार
SHARES

कोरोना व्हायरसचा (coronavirus update) संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि प्रशासन आपल्या पातळीवर कसोशीने प्रयत्न करत आहे. संचारबंदीमुळे सर्वसामान्य, गरजूंची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी काही सामाजिक संस्थाही पुढे आल्या आहेत. त्यातच अशा संकट काळात सामाजिक भान राखत राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या सर्व आमदार आणि खासदारांच्या एका महिन्याचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (ncp chief sharad pawar) यांनी सोशल मीडियावरून दिली आहे. 

रोजगार बुडाला, शेतीवरही संकट

शरद पवार यांनी एक पत्रक प्रसिद्ध करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि खासदारांना एका महिन्याचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला (cm relief fund) देण्याची सूचना केली आहे. या पत्रकात त्यांनी म्हटलं आहे की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार कसोशीने प्रयत्न करत आहेत. या जागतिक महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदीसारखी पावले उचलावी लागल्याने लोकांचा रोजगार बुडाला असून शेती व उद्योगधंद्यावर देखील मोठं संकट ओढावलं आहे. या अभूतपूर्व संकटावेळी राष्ट्रवादी पक्ष जनतेसोबत ठाम उभा आहे. 

राष्ट्रवादी पक्षाची एक सामाजिक जबाबदारी म्हणून राज्य व केंद्राच्या सदर सहाय्यता कार्यास हातभार लागावा या हेतूने राज्य विधीमंडळातील विधानसभेचे व विधान परिषदेचे सदस्य यांचं एक महिन्याचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तसंच संसदेतील लोकसभा व राज्यसभा सदस्यांचं एक महिन्याचं वेतन प्रधानमंत्री सहाय्यता निधीसाठी (pm relief fund) देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. असं म्हणत सदर धनादेश राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्याची सूचनाही पवार यांनी सदस्यांना केली आहे.  

केंद्राचीही मदतनिधीची घोषणा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरूवारी १ लाख ७०हजार कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजची घोषणा केली आहे. कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लाॅकडाऊनची घोषणा केली आहे. या कालावधीत हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होत आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत या पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे.

देशात कोणीही उपाशी राहणार नाही याची काळजी आम्ही सरकार म्हणून घेत आहोत असंही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं.  गरीबांना पाच किलो गहू किंवा तांदूळ १ किलो डाळ मोफत मिळणार. पुढील तीन महिन्यांसाठी ही योजना असणार आहे. . देशातील ८० कोटी लोकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. आशा वर्कर, नर्सेस आणि आरोग्य विभागात काम करणाऱ्यांना ५० लाखांचं विमा संरक्षण देण्यात येणार असल्याचंही सीतारामन यांनी जाहीर केलं. देशभरातील २० लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा