Advertisement

कोरोनासोबतच न्यूमोनियाचे पेशंट वाढण्याची शक्यता- मुख्यमंत्री

कोरोनाच्या विषाणूंची लक्षणं पाहता न्यूमोनियाचे (pneumonia) पेशंटही वाढण्याची शक्यता आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

कोरोनासोबतच न्यूमोनियाचे पेशंट वाढण्याची शक्यता- मुख्यमंत्री
SHARES

आपले डाॅक्टर कोरोनाशी दररोज दोन हात करत आहेत. कोरोनाचे (Coronavirus) रुग्ण वाढत असले, तरी काही रुग्ण या आजाराची मुकाबला करून घरी देखील परतत आहेत. कोरोनाच्या विषाणूंची लक्षणं पाहता न्यूमोनियाचे (pneumonia) पेशंटही वाढण्याची शक्यता आहे. तेव्हा डाॅक्टरांनी सर्दी, खोकला, ताप असणाऱ्या रुग्णांची नीट तपासणी करून त्यांच्याबाबत कुठलाही संशय आल्यास ताबडतोब कोरोना कक्षाशी संपर्क साधावा अशा सूचना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी केलं. 

सर्वपक्षांकडून सहकार्य

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी फेसबुक लाइव्हद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी कोरोनाच्या (covid-19) लढाईत दिवसरात्र मेहनत करणारे डाॅक्टर, नर्स, वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आभार मानले. संकटाच्या काळात सत्ताधारी पक्षातील मंत्री, नेत्यांसोबतच विरोधी पक्षातील नेते देखील सहकार्य करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

हुज्जत घालू नका

जगभरातील बहुतेक देश कोरोनाच्या संकटात अडकलेत. जे देश कोरोनाबाबत आधी गाफील राहिले, त्यांची अवस्था आज बघवत नाही. त्यामुळे कुणीही आपल्या मदतीला धावून येणार नाही. आपली मदत आपल्यालाच करायची आहे. त्यामुळे घराबाहेर पडू नका. जीवनावश्यक वस्तू २४ तास सुरू ठेवल्या आहेत. भाजीपाला, अन्नधान्य, औषधं पुरेशा प्रमाणात आहेत. त्यामुळे या वस्तू घेण्यासाठी बाजारात गर्दी करू नका. नाहीतर सरकारला कडक उपाययोजना कराव्या लागतील. पोलिसांशी हुज्जत घालू नका. आधीच त्यांच्यावर मोठा ताण आहे. नियमांचं पालन करा. 

रुग्णांना तपासा

कोरोनाबरोबरच आता न्यूमोनियाचे रुग्णही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे डाॅक्टरांनी सर्दी, खोकला, ताप आलेल्या रुग्णांना तपासून शंका आल्यास त्यांना त्वरीत कोरोना कक्षात पाठवा. गरोदर महिला, वृद्ध, लहान मुलांसोबत, मधुमेह, स्थूलता, रक्तदाब, हृदयविकार असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी. डाॅक्टरांनी पुढाकार घेऊन आपले दवाखाने सुरू ठेवावेत.

बघता बघता लाॅकडाऊन करून ८ दिवस उलटून गेले आहेत. उरलेले दिवस देखील असेच निघून जातील. बाहेरच्या संकटाशी मुकाबला करण्यासाठी सरकार खंबीर आहे. तेव्हा तुम्ही घरातच राहून स्वत:ची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं. 


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा