Advertisement

मी केंद्रात जावं असं शुभचिंतकांना कितीही वाटलं तरी.., देवेंद्र फडणवीसांचा खुलासा


मी केंद्रात जावं असं शुभचिंतकांना कितीही वाटलं तरी.., देवेंद्र फडणवीसांचा खुलासा
SHARES

राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार अशी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. मात्र ज्याला महाराष्ट्राचं राजकारण कळतं, त्याला हे पक्क ठाऊक आहे की मी राज्याच्या राजकारणातच राहीन, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

नागपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळातील समावेशाच्या चर्चांवर प्रश्न विचारला असता ते म्हणाले, माझा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होईल, अशी चर्चा नेहमीच असते. परंतु आमच्या पक्षात आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आदेश देतात, तो आदेश सर्वांकरीता शिरोधार्य असतो.

मात्र एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो की, भारतीय जनता पक्षाचं आणि महाराष्ट्राचं राजकारण ज्याला कळतं, त्याला लक्षात येईल की मी महाराष्ट्राबाहेर जाण्याची कुठलीही शक्यता नाही. खरं म्हणजे जे माझे शुभचिंतक आहेत, त्यांना असं वाटतं की मला दिल्लीत काहीतरी मिळालं की आनंद होईल. त्यांनाही मी सांगतो की माझी जाण्याची शक्यता नाही. आणि काही लोकांना वाटतं की हा दिल्लीला गेला तर बला टळेल, मात्र बला टळणार नाही. हे देखील स्पष्टपणे सांगतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्रातील राजकारणाबद्दल विचाराल, तर आमच्या पक्षाने मला जी भूमिका दिली आहे ती भूमिका मी मजबूतीने निभावत आहे. मला देखील वाटत नाही, की मला आता दिल्लीला जाण्याची आवश्यकता आहे. आमचा पक्ष यावर निर्णय घेईल, असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा