Advertisement

शरद पवार आमचे राजकीय विरोधक; शत्रू नाहीत- देवेंद्र फडणवीस

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आमचे राजकीय विरोधक आहेत, शत्रू नाहीत, असं म्हणत माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेते गोपीचंद पडळकरांचे कान टोचले.

शरद पवार आमचे राजकीय विरोधक; शत्रू नाहीत- देवेंद्र फडणवीस
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आमचे राजकीय विरोधक आहेत, शत्रू नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर अशा शब्दांत टीका करणं योग्य नाही, असं म्हणत माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेते गोपीचंद पडळकर यांचे कान टोचले आहेत. 

शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत, असं वादग्रस्त वक्तव्य पडळकर यांनी केलं होतं. या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून पडळकरांवर जोरदार प्रतिहल्ले करण्यात आले. परंतु हे वक्तव्य पडळकरांचं वैयक्तिक असून त्याचा भाजपचा काहीही संबंध नसल्याचं म्हणत भाजपने आपले हात झटकले होते.

योग्य शब्द वापरले पाहिजेत

यावर प्रसार माध्यमांनी देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, शरद पवार हे आमचे राजकीय विरोधक आहेत, पण शत्रू नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल असे शब्द वापरणं चुकीचं आहे. मी या संदर्भात पडळकरांशी फोनवरून चर्चा केली. तेव्हा भावनेच्या भरात आपण हे विधान केल्याचं पडळकरांनी मान्य केलं आहे. याबाबत ते स्वत:च लवकर खुलासा करतील. कोणत्याही कठोर भावना मांडण्यासाठी योग्य ते शब्द वापरले गेले पाहिजेत, असं माझं मत आहे.

हेही वाचा - शरद पवार महाराष्ट्राला लागलेले कोरोना, गोपीचंद पडळकरांचं वादग्रस्त वक्तव्य

तर, शरद पवार यांच्याशी आमचे राजकीय मतभेद आहेत. त्यांचं राजकारण आणि विचारधारेशी आम्ही असहमत आहोत. पण पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबत पडळकरांनी असं विधान करायला नको होतं. पवारांबाबत पडळकरांनी केलेल्या विधानाशी सहमत नाही, असं भाजपचं आमदार अतुल भातखळकर यांनी सांगितलं. 

काय म्हणाले होते पडळकर?

शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत. ते गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राचं राजकारण करत आहेत. पण या काळात त्यांनी बहुजन समाजाला झुलवत ठेवून केवळ राजकारण केलं. बहुजन समाजाला कधीही पुढं येऊ दिलं नाही. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. त्यामुळे पवार हे धनगर आरक्षणावर पॉझिटिव्ह असतील असं वाटत नाही. खरं तर पवार यांची कुठलीही विचारधारा नाही, अजेंडा नाही आणि व्हिजनही नाही, अशी टीका पडळकरांनी शरद पवारांवर केली होती.

त्यावर शरद पवार यांच्याबद्दल असं बोलायची महाराष्ट्रातील विरोधकांची देखील हिंमत झाली नाही. त्यामुळे गोपीचंद पडळकरांनी जरा तोंड सांभाळून बोललं तर बरं होईल, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिला होता.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा