Advertisement

चौथ्या दिवशीच फडणवीस सरकार कोसळलं, विश्वासदर्शक ठरवाआधीच दिला राजीनामा

मी पुन्हा येणार, असं म्हणत रात्रीच्या काळोखात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत भाजपचं सरकार स्थापन करणारे मु​ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस​​​ यांनी अखेर मंगळवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

चौथ्या दिवशीच फडणवीस सरकार कोसळलं, विश्वासदर्शक ठरवाआधीच दिला राजीनामा
SHARES

मी पुन्हा येणार, असं म्हणत रात्रीच्या काळोखात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत भाजपचं सरकार स्थापन करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर मंगळवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर फडणवीस सरकार अवघ्या ४ दिवसांतच कोसळलं. सह्याद्री अतिथीगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी आपली बाजू मांडताना राज्यातील सद्यस्थितीला शिवसेनेला जबाबदार धरलं. 

यावेळी ते म्हणाले, आम्ही राज्यात शिवसेनेसोबत महायुती करून निवडणूक लढवली. जनतेने भाजपच्या बाजूने कौल दिला. कारण भाजपने जेवढ्या जागा लढवल्या होत्या, त्यापैकी ७५ टक्के जागांवर विजय मिळवला. तर शिवसेनेने लढवलेल्या जागांपैकी केवळ ४० टक्के जागांवरच त्यांना विजय मिळवता आला. परंतु निकालानंतर शिवसेनेने आमच्यासोबत सत्ता स्थापन करण्याऐवजी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत बोलणी सुरू केली. कमी जागा मिळूनही बार्गेनिंग पावर वाढल्याचं समजून शिवसेनेने जे ठरलंच नव्हतं, अशा अवास्तव मागण्या केल्या. त्यातूनच नवीन सरकार बनवण्याची वेळ निघून गेली. 

ते पुढं म्हणाले, राज्यपालांनी सर्वात पहिल्यांदा भाजपला सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलं. परंतु पुरेसं संख्याबळ नसल्याने भाजपने त्यास नकार दिला. त्यानंतर शिवसेनेला निमंत्रण देण्यात आलं. त्यात संख्याबळ नसतानाही शिवसेनेने सत्ता स्थापनेचा दावा करून स्वत:चं हसं करून घेतलं. पाठोपाठ राष्ट्रवादीला संधी देण्यात आली. मात्र राष्ट्रवादीने त्याला नकार दिला. अखेर सत्ता स्थापनेसाठी कुणीही पुढं येत नसल्याने राज्यपालांच्या शिफारसीनुसार राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. 

दरम्यानच्या काळात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या वेगळ्या विचारणीच्या पक्षांनी एकत्र येऊन बोलणी सुरू केली. किमान समान कार्यक्रमाच्या नावाखाली भाजपला सत्तेपासून दूर ठेवणं या व्यतिरिक्त या तिन्ही पक्षाला कुठलाही कार्यक्रम आखता आला नाही. सत्ता स्थापनेस उशीर होत असल्याने शेतकऱ्यांचे, सामान्यांचे असंख्य प्रश्न प्रलंबित होते. अशातच  राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार आमच्याकडे पाठिंब्याचं पत्र घेऊन आले. त्याआधारे आम्ही राज्यात सत्ता स्थापन केली. मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारताच सामान्यांना दिलासा देणारी अनेक कामं केली. परंतु मंगळवारी अजित पवार यांनी युतीत सहभागी होऊ शकत नसल्याचं म्हणत आपल्या उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आमच्याकडे  बहुमत सिद्ध करण्यास पुरेसं संख्याबळ उरलेलं नाही. तसंच आम्हाला फोडाफोडीचं राजकारण करायचं नसल्याने मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत आहे, असंही फडणवीस यांनी सांगितलं.



हेही वाचा-

बुधवारीच बहुमत चाचणी घ्या, गुप्त मतदानही नको- सर्वोच्च न्यायालय

अजित पवारांचा उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा