Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
52,26,710
Recovered:
46,00,196
Deaths:
78,007
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
38,859
2,116
Maharashtra
5,46,129
46,781

पदवीधर मतदार नोंदणी केलीत का? नसेल तर हे वाचा!

पदवीधर मतदार नोंदणी नक्की कशी करतात? का करतात? यातून आपल्याला नक्की काय फायदा होतो? पदवीधर मतदारांचा आमदार नक्की काय काम करतो? आणि मुळात पदवीधर मतदारांचे 'वेगळे' असे काय प्रश्न असतात? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. याच प्रश्नांची सविस्तर उत्तरं शोधण्यासाठी मुंबई मतदारसंघातून उभ्या असलेल्या डॉ. दीपक पवार यांच्याशी आम्ही थेट चर्चा केली...

पदवीधर मतदार नोंदणी केलीत का? नसेल तर हे वाचा!
SHARES

बातमीला शीर्षक म्हणून दिलेला प्रश्न जर तुम्ही विचारलात, तर बऱ्याच जणांकडून हा नक्की काय प्रकार आहे? अशाच आशयाच्या प्रतिक्रिया तुम्हाला मिळतील! तुमच्या आसपास असलेल्या 5 पैकी किमान 3 ते 4 जणांना ही नोंदणी नक्की कशी करतात? का करतात? यातून आपल्याला नक्की काय फायदा होतो? पदवीधर मतदारांचा आमदार नक्की काय काम करतो? आणि मुळात पदवीधर मतदारांचे 'वेगळे' असे काय प्रश्न असतात? हेच माहिती नसतं. याच पार्श्वभूमीवर 2018च्या जुलैमध्ये होणाऱ्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकांसाठी मुंबई मतदारसंघातून उभ्या असलेल्या डॉ. दीपक पवार यांच्याशी आम्ही थेट चर्चा केली. 

डॉ. दीपक पवार हे अनेक वर्षांपासून मुंबई विद्यापीठात राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. शिवाय मराठी भाषेच्या पुरस्कारासाठी, विकासासाठी आणि वापरासाठी ते प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठात सध्या सुुरु असलेला निकालांचा घोळ, पदवीधर निवडणुकीबद्दलची अनास्था, राजकीय पार्श्वभूमी, पैशांचं गणित अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी 'मुंबई लाईव्ह'च्या थेट मुलाखतीमध्ये इत्थंभूत चर्चा केली. मात्र, मुंबईकर पदवीधर मतदार संघातील मतदारांसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्ज कुठे मिळणार? इथपासून ते निवडणुकीच्या वेळापत्रकापर्यंत सर्व माहिती त्यांनी या मुलाखतीमध्ये सविस्तर दिली.डॉ. दीपक पवार यांची संपूर्ण मुलाखत ऐकण्यासाठी इथे क्लिक करा:काही मूलभूत आकडेवारी...

महाराष्ट्रात एकूण 6 पदवीधर मतदारसंघ आहेत. त्यात मुंबईत विधानसभेचे एकूण 36 मतदारसंघ आहेत. आणि या 36 विधानसभा मतदारसंघांचा मिळून एकच पदवीधर मतदारसंघ आहे. सामान्यपणे प्रत्येक विधानपरिषदेच्या 1/12 सभासद हे पदवीधर मतदानातून निवडून आलेले असावेत.


कधी आहे निवडणूक?

मुंबई पदवीधर मतदार संघाची निवडणूक जुलै 2018मध्ये होणार आहे. मात्र त्यासाठी मतदार नोंदणी आत्तापासूनच सुरु करण्यात आली आहे. आणि ही मतदारनोंदणी थेट जून 2018पर्यंत सुरु रहाणार आहे. त्यातला मतदार नोंदणीचा पहिला टप्पा 6 नोव्हेंबरपर्यंत सुरु रहाणार आहे. तर दुसरा टप्पा डिसेंबरपर्यंत असणार आहे. मात्र, त्यापुढेही अगदी जून 2018पर्यंत तुम्ही मतदार यादीमध्ये तुमच्या नावाचा समावेश करू शकता.


काय आहे पात्रता?

पदवीधर मतदार नोंदणीसाठी कोण अर्ज करू शकतं, याविषयी सामान्यपणे संभ्रम दिसून येतो. मात्र याचे पात्रता निकष अत्यंत सोपे आहेत.

1) अर्ज करणारी व्यक्ती सरकारी निर्देश दिल्याच्या 3 वर्ष आधी म्हणजेच 1 ऑक्टोबर 2017च्या 3 वर्ष आधी पदवीधर झालेली असावी

2) व्यक्ती मुंबईची रहिवासी असावी (कुलाबा ते मानखुर्द, कुलाबा ते मुलुंड आणि कुलाबा ते दहिसर)


कसा कराल अर्ज?

नोंदणीसाठीचा अर्ज तुम्हाला मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या या https://ceo.maharashtra.gov.in/ वेबसाईटवर मिळू शकेल. अर्ज डाऊनलोड केल्यानंतर त्यावरची माहिती भरून तुमच्या संबंधित मतदारसंघातील केंद्रावर जमा करायचा आहे. ते शक्य नसल्यास उपनगरातील अर्जदार तुमचे अर्ज वांद्रे कलेक्टर हाऊसमध्ये जमा करू शकतात. किंवा मुंबईतले अर्जदार त्यांचे अर्ज ओल्ड कस्टम हाऊसमध्ये जमा करू शकतात.


अर्जासोबत कोणती कागदपत्र द्याल?

या अर्जासोबत तुमचा एक फोटो, आधारकार्डची झेरॉक्स आणि तुमच्या डिग्री सर्टिफिकेटची झेरॉक्स जमा करायची आहे. काही अर्जदारांना अद्याप डिग्री सर्टिफिकेट मिळालं नसल्यास त्यांच्या पदवी वर्षाच्या मार्कशीटची झेरॉक्सही चालू शकेल. शिवाय, या कोणत्याही कागदपत्राला इतर नोटरी अटेस्टेशनची गरज नाही. ही कागदपत्र तुम्ही स्वत:च्या सहीने अटेस्टेड (सेल्फ अटेस्टेड) करू शकता. नोटरी किंवा सरकारी अधिकाऱ्याच्या अटेस्टेशनची गरज नाही.

पदवीधर मतदानाची संख्या वाढावी यासाठी मुळात पदवीधर मतदार वाढणं आवश्यक आहे. त्यासाठी मोठ्या संख्येने पदवीधरांनी मतदार नोंदणी करण्यासाठी पुढाकार घेणं गरजेचं आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा