मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पहिलाच दसरा मेळावा बीकेसी मैदानात पार पडला. एकनाथ शिंदेंनी दीड तासाच्या भाषणात गद्दारी आणि खोके या आरोपांना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, ‘दोन महिन्यांपासून आम्हाला खोके-खोके, गद्दार म्हटले जात आहे. होय गद्दारी झाली, पण २०१९ मध्ये. तेव्हा ज्या निवडणुका झाल्या त्यानंतरची आघाडी हीच खरी गद्दारी होती. ती बाळासाहेबांचे विचार आणि जनतेशी गद्दारी होती. आम्ही गद्दार नाही, गदर आहोत. गदर म्हणजे क्रांती. तुम्हाला ४० आमदार, १२ खासदार, १४ राज्यांतील प्रमुख आणि लाखो शिवसैनिकांनी का सोडलं? याचं तुम्ही गद्दार-गद्दार म्हणून टाहो फोडण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा.’
शिंदे म्हणाले, आनंद दिघेंच्या मृत्यूनंतर त्यांना (उद्धव ठाकरे) मी पहिल्यांदाच भेटलो. मला वाटले ते आता ठाण्यातील पक्ष, नेते आदींबाबत विचारतील. मात्र, त्यांनी दिघेंची प्रॉपर्टी किती आहे, कुठे आहे, कुणाच्या नावावर आहे, अशी विचारणा केली, असा खळबळजनक खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
तसेच वेदांता-फॉक्सकॉन ही कंपनी गुजरातला गेल्याच्या वादावरही त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला. तुमच्या टक्केवारीमुळे ही कंपनी गुजरातला गेली. कंपनी मालकाला सरकार बदलणार याची माहिती नव्हती.’
पक्ष काही तुमची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही. अनेकांच्या घामातून शिवसेना उभी राहिली. ती कुणाच्याही दावणीला बांधता येणार नाही. सावरकर हे आमचे दैवत, पण काँग्रेसचा विरोध म्हणून त्यांचे नाव घ्यायचे नाही. तुम्ही खुर्चीसाठी लाचारी पत्करली. तुमचं वर्क फ्रॉम होम, आमचं वर्क विदाऊट होम...
दरम्यान जयदेव बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र जयदेव ठाकरेंना व्यासपीठावर आणून एकनाथ शिंदे यांनी साक्षात ठाकरेंचे वारसदार आपल्यासोबत असल्याचा संदेश दिला. जयदेव ठाकरे म्हणाले, ‘माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की, या एकनाथाला एकटा नाथ होऊ देऊ नका, त्याची साथ सोडू नका. एकनाथराव जे काही काम करतात, जसा शेतकरी राबतो, तसा हा एकनाथ राबकरी आहे, कष्टकरी आहे. त्याला दुरावा देऊ नका. माझं तर हे म्हणणं आहे की, आता हे सगळं बरखास्त करा, पण शिंदे राज्य येऊ द्या.’
हेही वाचा