खडसे 'कमबॅक'च्या तयारीत!

  Mumbai
  खडसे 'कमबॅक'च्या तयारीत!
  मुंबई  -  

  महाराष्ट्राचे माजी महसूलमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार एकनाथ खडसे यांना आता राज्य मंत्रिमंडळात पुनरागमनाचे वेध लागले आहेत. लवकरच एकनाथ खडसे यांचं राज्य मंत्रिमंडळात कमबॅक होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मंत्रिपदावरून सक्तीने पायउतार व्हावं लागल्यानंतर स्वपक्षावर नाराज असलेले एकनाथ खडसे गेले काही दिवस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयांविरोधात तोंडसुख घेताना दिसले. पण आता नाथाभाऊंचा नूर आणि सूर बदलला आहे.

  शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय हा क्रांतीकारक आहे, असं प्रशस्तीपत्रक खडसे नुकतंच दिलं होतं. या वक्तव्यातलं ‘बातमीमूल्य’ संपायच्या आधीच त्यांनी स्वतःच्या मतदारसंघात आयोजित कार्यक्रमात बोलताना शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला हाणला.

  मंत्रिपद गेल्यापासून मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करणाऱ्या आणि राज्य सरकारच्या धोरणांना विरोध करणाऱ्या खडसे यांनी अचानक सत्तेत बसलेल्या भाजपाविरोधकांना खडे बोल सुनावले आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यात काहीतरी जादूची कांडी फिरली, अशी चर्चा आहे. यात तथ्य असेल तर एकनाथ खडसे यांच्या मतपरिवर्तनाचं श्रेय भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना द्यावं लागेल.


  एकनाथ खडसे यांना मंत्रिपद देण्याची ‘शाही’ इच्छा

  अमित शाह यांनी एकनाथ खडसे यांच्या मंत्रिमंडळातल्या वापसीला हिरवा कंदिल दिल्याची सूत्रांची माहिती आहे. एमआयडीसी जागा घोटाळा, आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिमशी दूरध्वनीवरील कथित संभाषण आदी आरोपांनी घेरले गेलेल्या एकनाथ खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आलं होतं. हे त्यांच्या जिव्हारी लागलं होतं. विरोधकांपेक्षा स्वपक्षातल्या नेत्यांनी आपल्या वाटेत काटे पेरले, ही खदखद खडसे यांनी अनेकदा जाहीरपणे बोलूनही दाखवली. विधानसभेत भाषण करतानाही खडसे यांनी राज्य सरकारविरुद्ध शाब्दिक तलवारबाजी केली.  


  भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या मुंबई भेटीनंतर मात्र हे चित्र बदललं. शाह यांनी  खडसे यांची बाजू ऐकून घेतली आणि मंत्रिमंडळात त्यांच्या पुनरागमासाठी अनुकूलता दर्शवली. स्वाभाविकपणे बदल्यात खडसे यांना मुख्यमंत्र्यांशी जुळवून घ्यावं लागणार होतं. नेमकं तेच करताना खडसे दिसत आहेत. सर्वच बाबतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सिनीयर असलेले नाथाभाऊ गेले काही महिने राजकीय विजनवासात असल्याप्रमाणे होते. हा विजनवास त्यांना संपवायचा आहे. त्यामुळे अमित शाह यांच्या निर्देशानुसार वागायला त्यांनी सुरुवात केली आहे.

  शिवसेनेविरोधात काय बोलले खडसे?

  मुक्ताईनगरमध्ये स्वतःच्या फार्महाऊसवर पक्षविस्तारकांच्या सभेला संबोधित करताना खडसे यांनी, पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांवर टिका करणाऱ्या सहयोगी पक्षांनी सत्तेतून बाहेर पडावे, असा शिवसेनेला दम भरला. एकीकडे सत्तेची फळं चाखत असताना दुसरीकडे पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या आवाजाची नक्कल करणाऱ्या, त्यांच्यावर जहरी टिका करणाऱ्या पक्षांनी सत्तेबाहेर व्हावे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

  एकनाथ खडसे यांच्या पावित्र्याने शिवसेनेचे नेतामंडळीही गांगरली तर नवल नाही. खडसे यांनी मंत्रिपदावर असताना, तसंच भाजपाचे प्रतिनिधी म्हणून शिवसेनेशी जागावाटप आदी विषयांवर बोलणी करताना शिवसेनेला अपमानित करण्याची एकही संधी सोडली नव्हती. मंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागल्यानंतर खडसे यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात शस्त्र परजलं. आता मंत्रिपदावर पुनरागमन होण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर खडसे यांच्या निशाण्यावर पुन्हा एकदा शिवसेना असणार, हे उघड आहे. तूर्त तरी एकनाथ खडसे यांचं ‘मिशन मंत्रिपद’ जोरात आहे.


  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.