Advertisement

सचिन अहीर शिवसेनेत, हाती बांधलं शिवबंधन

अहीर यांच्या शिवसेना प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. अहिर यांच्या पक्षांतरामुळं एकाबाजूला शिवसेनेचं बळ वाढणार असून मुंबईत आधीच कमकुवत असलेल्या राष्ट्रवादीला खिंडार पडणार आहे.

सचिन अहीर शिवसेनेत, हाती बांधलं शिवबंधन
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहीर यांनी गुरूवारी शिवसेनेते प्रवेश केला. अहिर यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडून शिवबंधन हाती बांधून घेतलं. अहीर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. भायखळा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं बोललं जात आहे. 

राष्ट्रवादीला खिंडार

अहीर यांच्या शिवसेना प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. अहिर यांच्या पक्षांतरामुळं एकाबाजूला शिवसेनेचं बळ वाढणार असून मुंबईत आधीच कमकुवत असलेल्या राष्ट्रवादीला खिंडार पडणार आहे. अहिर यांनी बुधवारी संध्याकाळी आपल्या कार्यक्षेत्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यात त्यांनी आपल्या भावी वाटचालीची कल्पना देत आतापर्यंत जशी साथ दिलीत, तशी पुढेही द्या, असं आवाहन कार्यकर्त्यांना केलं होतं. त्यानुसार गुरूवारी सकाळी मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांसोबत त्यांनी मातोश्री गाठलं.

राष्ट्रवादी फोडणार नाही

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी शिवसेनेत प्रवेश करत आहे. मी गेल्या आठवड्यात शरद पवार यांना फोन करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यांचं स्थान माझ्या हृदयात कायम राहणार आहे. राजकारणात काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. प्रत्येकाची काही स्वप्नं असतात, ती स्वप्नं पूर्ण करण्यासाठी जर मला संधी मिळत असेल, तर ती संधी स्वीकारली पाहिजे.  मी राष्ट्रवादी फोडणार नाही. परंतु शिवसेना वाढवण्याचं काम नक्कीच करणार आहे. सोबतच पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारेन, असं यावेळी अहीर म्हणाले. 

काय म्हणाले उद्धव?

राजकारण हे राजकारणासारखं करावं लागतं. पक्ष फोडणं ही शिवसेनेची वृत्ती नाही. मला फोडलेली माणसं नकोत, मनं जिंकलेली माणसं हवी आहेत. आम्हाला कुठलाही पक्ष फोडायचा नाही, तर शिवसेना वाढवायची आहे. पक्ष वाढवण्यासाठी मला जे काही करता येईल, ते सर्व मी करणार. पक्षात चांगली माणसे येत आहेत, तर त्यांना येऊ द्या. यामुळे मराठी माणूस आणि हिंदूंची ताकद वाढत आहे. शिवसेनेत तुम्ही नाराज होणार नाही याची खात्री देतो, अशी ग्वाही यावेळी उद्धव ठाकरे यांनी अहीर यांना दिली. 

तर, सचिन अहिर यांच्या रुपाने एक चांगला नेता शिवसेनेला मिळाला आहे. त्यांच्या अनुभवाचा शिवसेनेला निश्चितच फायदा होईल, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.

भायखळातून लढणार? 

सचिन अहिर याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे वरळी मतदारसंघाचे आमदार होते. मात्र, मागील निवडणुकीत शिवसेनेच्या सुनील शिंदे यांनी त्यांचा पराभव केला. राष्ट्रवादीकडून पुन्हा निवडणूक लढवून जिंकणं शक्य नाही, याची जाणीव असल्यानेच त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. शिवसेनेकडून ते भायखळा विधानसभा लढवण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात सध्या एमआयएमचे वारीस पठाण आमदार आहेत. हेही वाचा-

मिलिंद देवरा यांचं मुंबई अध्यक्षपद कायम? २ कार्याध्यक्षही मिळण्याची शक्यता

मराठा क्रांती मोर्चाचा 'रोखठोक' निर्णय, विधानसभेच्या सर्व जागा लढवणारRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा