Advertisement

राज्यात डिझेलही ४ रुपयांनी स्वस्त होणार- मुख्यमंत्री

पेट्रोलप्रमाणे डिझेलच्या दरांतही दिलासा देण्याची मागणी होत असल्याने राज्य सरकारने त्यासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. डिझेल ४ रुपयांनी स्वस्त करण्यासाठी लवकरच अधिसूचना काढण्यात येईल. अशी शक्यता आहे.

राज्यात डिझेलही ४ रुपयांनी स्वस्त होणार- मुख्यमंत्री
SHARES

महाराष्ट्रात पेट्रोल प्रति लिटर ५ रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर आता डिझेलचे दरही लवकरच प्रति लिटर ४ रुपयांनी कमी होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी याबाबतची माहिती एका कार्यक्रमात दिली.


केंद्र, राज्य सरकारचा निर्णय 

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे हैराण झालेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने गुरूवारी दर कपातीचे निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात प्रति लिटर दीड रुपयांनी कपात केली होती, तर पेट्रोलियम कंपन्यांना प्रति लिटर १ रुपयांनी घट करण्यास सांगितलं होतं. एवढंच नव्हे, तर राज्य सरकारांना देखील इंधन दरांवरील मूल्यवर्धीत कर अर्थात व्हॅटमध्ये कपात करण्याचं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केलं होतं.


महाराष्ट्रात पेट्रोलचे दर घटवले

या आवाहनाला प्रतिसाद देत राज्य सरकारने केवळ पेट्रोलच्या दरांत प्रति लिटर अडीच रुपये व्हॅट दरकपातीचा निर्णय घेतल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केलं. केंद्र सरकार आणि तेल कंपन्या यांचे मिळून अडीच रुपये आणि राज्य सरकारचे अडीच रुपये यानुसार पेट्रोलच्या दरांत ५ रुपये घट झाली. तर डिझेलच्या दरांना राज्य सरकारने हात न लावल्याने डिझेलमध्ये केवळ अडीच रुपयांची घट झाली होती. त्यात आणखी दीड रुपयांची घट करण्यास राज्य सरकार प्रयत्नशील आहे.


डिझेलचेही दर घटवणार- मुख्यमंत्री

पेट्रोलप्रमाणे डिझेलच्या दरांतही दिलासा देण्याची मागणी होत असल्याने राज्य सरकारने त्यासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. डिझेल ४ रुपयांनी स्वस्त करण्यासाठी लवकरच अधिसूचना काढण्यात येईल. रात्रीपर्यंत यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. इंधनावरील कपात केल्याने राज्य सरकारला आर्थिक तोटा सहन करावा लागेल. पण इंधनाचे दर पाहता जनतेला दिलासा देण्यासाठी राज्य सरकार करावर पाणी सोडण्यास तयार आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.


केंद्र सरकारने आर्थिक बोजा सोसून इंधनाचे दर कमी केले आहेत. सध्या केंद्र सरकार आॅइल कंपन्यांच्या दर नियंत्रणासंदर्भात एक धोरण तयार करत आहे. सोबतच जीएसटी काउन्सिलने इंधनाचा समावेश जीएसटीत केल्यास देशभरात इंधनाचे दर एकसारखे राहतील.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री


हेही वाचा-

८ रुपयांच्या इंधनदरवाढीवर ५ रुपयांचा उतारा, नवीन दर अाज रात्रीपासून लागू


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement