लग्न पत्रिकेत मायबोली मराठीकडे दुर्लक्ष

मुंबई - मुलीचं लग्न अगदी साध्या पद्धतीने करण्याचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा आग्रह. एखादा केंद्रीय मंत्री अशा पद्धतीचा विचार करतोय ही नक्कीच स्वागतार्ह बाब. त्यासाठी लग्नाची पत्रिकाही अगदी साधी छापली गेली. पण गडकरी साहेब...साधी पत्रिका छापण्याच्या भानगडीत मराठी व्याकरणाकडे मात्र थोडं दुर्लक्षच झालं बरं का...पत्रिकेच्या पहिल्याच ओळीमध्ये श्री रेणुकामधली एक जागा गायबच झालीये. रवींद्रमध्ये ‘वी’वरचा अनुस्वार पक्षबदल करून ‘द्र’च्या पार्टीत सामील झालाय. विवा’ह’निमित्त पडलेला एका कान्याचा प्रश्न या विवा’हा’निमित्त सुटेल का हाच प्रश्न उपस्थित झालाय. तर पुढे अपेक्षित ‘उपस्थित’ऐवजी उवस्थित लिहिल्यामुळे मूळ मराठी व्याकरणाचाच मुद्दा उपस्थित झालाय. आता क्रीडा नेहमी ऱ्हस्व नसून दीर्घच पाहिजे हा तर अगदी साधा आणि सर्वमान्य नियम. आता गडकरी साहेब विकास, प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करण्याचं स्वप्न पहाताना मायबोली मराठीच इतकी मागास ठेऊन कसं बरं चालेल?

Loading Comments