Advertisement

गीता गवळींचे भाजपाला समर्थन


गीता गवळींचे भाजपाला समर्थन
SHARES

मुंबई - अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका गीता गवळी यांनी गुरुवारी रात्री मुख्यमंत्र्यांची वर्षा या निवास्थानी भेट घेतल्यानंतर शुक्रवारी त्यांनी भाजपाला पाठिंबा दिला. शुक्रवारी दादर पूर्व येथील भाजपाच्या वसंत स्मृती येथील कार्यालयात आमदार योगेश सागर यांची भेट घेऊन त्यांनी समर्थन दर्शवले. गुरुवारी अखिल भारतीय सेनेेच्या नगरसेविका गीता गवळी यांना शिवसेनेकडे वळविण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. शिवसेनेचे जेष्ठ नेते सुभाष देसाई, एकनाथ शिंदे यांनी गीता गवळी यांना शिवसेना भवनवर चर्चेसाठी बोलावले होते. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार गीता गवळी यांना 'डॅडी' अरुण गवळीला जेलमधून बाहेर काढणे महत्वाचे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्रालय आहे. भाजपाला महापालिकेत समर्थन करण्यासाठी 'डॅडी'च्या सुटकेचे आश्वासन दिल्याची शक्यता आहे. 

दरम्यान नगरसेविका गीता गवळी यांनी शिवसेनेकडे पाच वर्षांसाठी आरोग्य समितीचे अध्यक्षपद किंवा पाच वर्ष स्थायी समितीत सदस्य म्हणून घेण्याची अट ठेवली. पण अभासेचा एकच नगरसेवक असल्याने शिवसेना नेत्यांनी गवळी यांची ही अट अमान्य केली. गवळी यांना जर महत्त्वाच्या समित्यांवर घेतले तर बाकी अपक्षही महत्त्वाच्या समित्यांचा आग्रह धरतील यामुळे शिवसेनेने गवळी यांचा प्रस्ताव अमान्य केल्याचं समजतं. मात्र शिवसेनेबरोबरची बोलणी फिस्कटल्यानंतर गीता गवळी यांनी गुरुवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट घेतली. या भेटीत सकरात्मक चर्चा झाल्याने गवळी यांनी भाजपाला पाठिंबा दिला.





Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा