'मतदान करू न शकलेल्यांना मतदानाची संधी द्या'

  Mumbai
  'मतदान करू न शकलेल्यांना मतदानाची संधी द्या'
  मुंबई  -  

  मुंबई - मुंबई महानगरपालिकेसाठी मंगळवारी मतदारांनी मोठ्या संख्येने बाहेर पडत मतदानाचा हक्क बजावला. मात्र 2012 च्या तुलनेत यंदा मुंबईत विक्रमी मतदानाची नोंद झाली आहे. पण त्याहीपेक्षा हे मतदान अनेक मतदारांच्या, उमेदवारांच्या लक्षात राहणार आहे, ते मतदार यादीत झालेल्या प्रचंड गोंधळामुळे. मुंबईभरातील सर्वच प्रभागांमध्ये मतदार याद्यांमध्ये गोंधळ दिसला. पावती न मिळाल्याने, यादीत नाव नसल्याने आणि मतदान केंद्र बदलल्याने अनेक जण मतदानाच्या हक्कापासून दूर राहिले.

  दरम्यान वांद्रे पूर्व येथील रिपाईचे महाराष्ट्र सचिव सुमित वजाळे यांनी प्रभाग क्रमांक 93 मधील अंदाजे 15 हजार मतदारांची नावे गायब झाल्याचा आरोप केला आहे. आरक्षण जाहिर झाले तेव्हा 93 प्रभागातील मतदारांची संख्या 54 हजारांच्या घरात होती. तीच संख्या मतदानाच्या वेळी 34 हजारांच्या घरात गेली. स्थलांतरीत, मृत वा इतर कारणांनी कमी झालेले मतदार वगळता अंदाजे 15 हजार मतदारांची नावे वगळली गेल्याचेही वजाळे यांनी सांगितले आहे. शासकीय वसाहत, शास्त्रीनगर, इंदिरानगर, एमआयजी कॉलनी आणि गांधीनगर अशा भागातील मतदारांची नावे यादीत नसल्याने हे मतदार मतदान करू शकले नाहीत. ही मत निर्णायक ठरू शकली असती असे म्हणत वजाळे यांनी मतदान करू न शकलेल्या मतदारांना मतदानाची संधी द्यावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचंही स्पष्ट केले आहे. अशीच मागणी मुंबईभरातील मतदारांकडून आणि पक्षांकडूनही होत आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.