पर्रिकर पुन्हा भारतात परतण्याची शक्यता

न्यूयॉर्क शहरामधील 'मेमोरिअल स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटर' च्या डाॅक्टरांनी मनोहर पर्रिकर यांच्यावर प्राथमिक उपचार करून भारतातील डाॅक्टरांच्या देखरेखेखालीच उपचार घ्यावेत, असा सल्ला दिल्याने ते पुन्हा भारतात परतण्याची शक्यता आहे, असं सूत्रांनी म्हटलं आहे.

SHARE

उपचारांसाठी अमेरिकेला गेलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर (६२) लवकरच भारतात परतणार असल्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात आली आहे.

पर्रिकर गेल्या आठवड्यात वांद्र्यातील लिलावती रुग्णालयात दाखल झाले होते. तिथून डाॅक्टरांच्या सल्ल्यानंतर ते पुढील उपचारांसाठी अमेरिकेला गेले. मात्र न्यूयॉर्क शहरामधील 'मेमोरिअल स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटर' च्या डाॅक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून भारतातील डाॅक्टरांच्या देखरेखेखालीच उपचार घ्यावेत, असा सल्ला दिल्याने ते पुन्हा भारतात परतण्याची शक्यता आहे, असं सूत्रांनी म्हटलं आहे. भारतात परतल्यावर पुन्हा लिलावती आणि गोव्यातील तज्ज्ञ डाॅक्टरांच्या देखरेखेखाली त्यांच्यावर उपचार सुरू राहण्याचीही शक्यता आहे.


गोव्यात आणीबाणी?

पर्रिकर राज्यात उपस्थित नसल्याने गोव्यातील सरकार नेतृत्वहिन झालं आहे. उद्योग व्यवसायात मंदीचं सावट असल्याने जनता गोंधळून गेली आहे. राज्यात आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याचं वक्तव्य नुकतंच सरकारमधील भाजपाचा सहयोगी पक्ष गोवा फाॅरवर्ड पार्टीचे प्रमुख विजय सरदेसाई यांनी केलं होतं. त्यावर शिवसेनेच्या गोवा प्रवक्त्या राखी प्रभूदेसाई यांनी गोव्यात राष्ट्रपती राजवट लागवट लागू करण्याची मागणी केली.


शिमगोत्सवातला छोटा पर्रिकर


 

कधी गेले अमेरिकेला?

स्वादूपिंडाच्या दुखण्याने त्रस्त पर्रिकर ५ मार्च रोजी मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दाखल झाले होते. पण त्यांना स्वादुपिंडाचा कर्करोग असल्याची माहिती सूत्रांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली होती. मात्र लिलावती रुग्णालय प्रशासनाने हे वृत्त फेटाळून लावलं. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर ते पुढील उपचारांसाठी अमेरिकेत जातील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यानुसार बुधवारी ७ मार्च रोजी पहाटे ते अमेरिकेच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती गोवा मुख्यमंत्री कार्यालयाने दिली.


  

सल्लागार समितीची नेमणूक

त्याआधी पर्रिकर यांनी गोव्याचे राज्यपाल मृदूला सिन्हा यांना पत्र लिहून उपचारांसाठी अमेरिकेला जात असल्याची माहिती दिली. सोबतच आपल्या अनुपस्थितीत राज्य प्रशासनाला मार्गदर्शन करण्यासाठी कॅबिनेट सल्लागार समिती नेमली. या समितीत फ्रान्सिस डिसुझा (भाजपा), सुदीन ढवळीकर (मगोप) आणि विजय सरदेसाई (गोवा फाॅरवर्ड पार्टी) यांचा समावेश आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या