Advertisement

आरोग्यमंत्री दीपक सावंत यांचा राजीनामा


आरोग्यमंत्री दीपक सावंत यांचा राजीनामा
SHARES

राज्याचे आरोग्यमंत्री आणि शिवसेना नेते दीपक सावंत यांनी आपला राजीनामा सोमवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख यांच्याकडे सोपवला. मात्र या दोघांनीही अद्याप सावंत यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही.


कारण काय?

मागील तीन टर्म विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदार संघातून उभं राहणाऱ्या डॉ. दीपक सावंत यांचा पत्ता शिवसेनेने कापल्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याचं म्हटलं जात आहे. डॉ.दीपक सावंत हे १८ वर्षे या मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आले असून सध्या ते आरोग्यमंत्रीपद भूषवत आहेत. यांच्या जागेवर कांदिवली ते दहिसरमधील शिवसेना विभागप्रमुख विलास पोतनीस यांना संधी दिली जाणार असल्याचं समजत आहे. 


पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी

विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी शिवसेनेच्यावतीने मागील अनेक दिवसांपासून उमेदवारांचा शोध सुरु होता. कारण विद्यमान पदवीधर मतदार संघातील आमदार आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याविषयी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी होती. पक्षाच्या विविध बैठकांमध्ये पदाधिकारी तसंच आमदारांनी अनेकदा ही नाराजी उघड केली होती. त्यामुळे दीपक सावंत यांचा पत्ता यंदा कापणार, हे जगजाहीर होतं. पण त्यांच्या जागी शिवसेना कुणाला संधी देते याकडे सर्वांचे लक्ष होतं.


नव्या उमेदवाराचा शोध

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी विभागप्रमुखांना बोलावून आपल्या नजरेत कुणी असा उमेदवार असल्यास सुचवण्यात यावा, अशी सूचना केली होती. विभागप्रमुखांना तसं विचारण्यात आलं होतं. त्यातून बोरीवली-दहिसरमधील विभागप्रमुख विलास पोतनीस यांचं नाव पुढं आलं आणि पक्षाने त्यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतल्याचं सुत्रांकडून समजतं.


निष्ठावान शिवसैनिक

विलास पोतनीस हे निष्ठावान शिवसैनिक असून बोरीवलीचे विभागप्रमुख आहेत, तसंच स्थानिक लोकाधिकार समितीचे गेली अनेक वर्षे ते ज्येष्ठ पदाधिकारी आहेत. विनोद घोसाळकर यांना विभागप्रमुख पदावरून हटवल्यानंतर माजी नगरसेवक प्रकाश कारकर यांच्याकडे विभागप्रमुख पदाचा भार सोपवण्यात आला होता. परंतु प्रकाश कारकर यांची प्रकृती बिघडल्याने हा पदभार उपविभागप्रमुख असलेल्या विलास पोतनीस यांच्याकडे सोपवण्यात आला होता. त्यानंतर विलास पोतनीस यांच्याकडे विभागप्रमुख म्हणून जबाबदारी सोपवली होती.


द्यावाचं लागणार राजीनामा


डॉ. दीपक सावंत यांचा पत्ता कापून त्या मतदार संघातून विलास पोतनीस यांची वर्णी लावली जाणार असल्याने आता सावंत यांना आरोग्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. सावंत यांनी तशी तयारी केली असून उध्दव ठाकरे यांच्या आदेशाची त्यांना प्रतीक्षा आहे. नियमानुसार अजून ६ महिने सावंत मंत्रीपदावर राहू शकतात.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा