Advertisement

अनधिकृत फेरीवाल्यांनो सावधान... गृहमंत्रालयाचे पालिकेला कारवाईचे आदेश


अनधिकृत फेरीवाल्यांनो सावधान... गृहमंत्रालयाचे पालिकेला कारवाईचे आदेश
SHARES

फेरीवाला धोरणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार शहरी फेरीवाले किंवा पथविक्रेता समिती स्थापन करण्यात येत आहे. प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांना समिती स्थापन करण्याच्या सूचना दिल्या असून, फेरीवाला आणि ना फेरीवाला क्षेत्र ठरविण्यात आले आहे. अनधिकृत पद्धतीने खाद्यपदार्थ विक्री करण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ कारवाई करण्याचे महापालिकेला निर्देश देण्यात आले असल्याची माहिती गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिली. मुंबईतील अनधिकृत फेरीवाला आणि चुकीच्या पद्धतीने जीवनावश्यक वस्तुंची साठवण यासंदर्भात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. त्यास उत्तर देताना गृहराज्यमंत्री रणजित पाटील बोलत होते.


फेरीवाल्यांवर गुन्हा दाखल

मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील नेहरूनगर रोड, सांताक्रूझ येथे अतिक्रमण निर्मूलन पथक आणि पोलिसांनी संयुक्तरित्या केलेल्या कारवाईदरम्यान सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण आणि फळे, भाजीपाला, जीवनावश्यक वस्तू चुकीच्या पद्धतीने पथ विक्रेत्यांमार्फत हाताळण्यात आल्याचे आढळून आले आहे. यासंदर्भात संबंधित फेरीवाल्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही पाटील यांनी सांगितले.


पथविक्रेता समितीची रचना

सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पथविक्रेता समितीची रचना करण्यात येणार आहे. या समितीत संबधित महानगरपालिकांचे आयुक्त किंवा नगरपरिषद व नगरपंचायतींचे मुख्याधिकारी अध्यक्ष असतील. पाच पदसिद्ध सदस्य, पथविक्रेत्यांमधून निवडून आलेले आठ प्रतिनिधी आणि सहा नामनिर्देशित सदस्य या समितीत असतील.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा