Advertisement

आरे कारशेडला स्थगिती, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय


आरे कारशेडला स्थगिती, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
SHARES

माझा विकासाला विरोध नाही, पण कुणी विकासाच्या नावाखाली वनसंपदेवर घाला घालत असेल, तर ते मला मान्य नाही, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रो ३ च्या आरे कारशेडच्या कामाला स्थगिती दिल्याचं सांगितलं.

विधानसभा निवडणुकीआधीपासूनच शिवसेनेने आरेचा मुद्दा उचलून धरला होता. मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसोहळ्याला 'आरे वाचवा'च्या कार्यकर्त्यांनी हजेरी लावत मुख्यमंत्र्यांकडून हा निर्णय रद्द करण्याची अपेक्षा व्यक्त केली होती.

उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दुपारी मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री म्हणून आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर सायंकाळी विधीमंडळ वार्ताहर संघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 

यावेळी वेगवेगळ्या विषयांसंदर्भात माहिती देताना मुख्यमंत्र्यांनी आरेच्या विषयालाही हात घातला. ते म्हणाले,

विकास हा झालाच पाहिजे. पण वैभव गमावून विकासकामे करणं मला मान्य नाही. त्यामुळे मी आरेतील कारशेडच्या कामाला स्थगिती दिली आहे. या कामाचं पुनर्परीक्षण होईपर्यंत ही स्थगिती कायम राहणार आहे. मात्र इतर विकासकामे सुरळीतपणे सुरूच राहणार आहेत. मेट्रोच्या कामाला कुठलीही स्थगिती देण्यात आलेली नाही. रातोरात झाडं कापणं मला मंजूर नाही. त्यामुळे आरेतील झाडंच नाही, तर एक पानही कुणाला तोडता येणार नाही.

फडणवीस सरकारला टोला हाणताना त्यांनी सांगितलं, मी मुख्यमंत्री म्हणून अनपेक्षितपणे आलो आहे. त्यामुळे इथल्या प्रथा, परंपरा ठाऊक नसताना मी हे शिवधनुष्य उचललं आहे. ठाकरे कुटुंबाने स्वत:साठी काहीही केलं नाही, हे सगळ्यांना ठाऊक आहे. ठाकरे कुटुंबाचा आणि पत्रकारांचा जुना ऋणानुबंध आहे. त्यावेळी मार्मिकच्या मुखपृष्ठावर जे चित्र होतं ते राज्यात आजही कायम आहे. आपल्याला महागाई, भ्रष्टाचार, टंचाईचा मिळून सामना करायचा आहे. जनतेच्या एकाही पैशाची उधळपट्टी होणार नाही, याची काळजी सरकार घेईल. पण त्यासाठी पत्रकारांनी सरकारचे कान, नाक आणि डोळे झाले पाहिजे. केवळ चुका सांगण्यापेक्षा चुका कशा सुधाराव्या हे देखील सांगितलं पाहिजे.


हेही वाचा- 

किमान समान कार्यक्रम ठरला, शेतकऱ्यांना कर्जमाफी, भूमिपुत्रांना ८० टक्के आरक्षण

उद्धव ठाकरेंचा शपथविधी : १०० आरे कार्यकर्त्यांची कार्यक्रमाला हजेरीRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा