SHARE

आपल्या भाषणाची सुरूवात करताना ‘माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो’, असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिक आणि पदाधिकाऱ्यांना साद घातली. मनसेच्या पहिल्या महाअधिवेशनात भाषण करताना राज यांनी भगव्या झेंड्यासोबतच हिंदुत्ववादी विचारणीच्या वाटचालीबद्दल परखडपणे भूमिका मांडली. 

मनसेने आपल्या पक्षाची भूमिका बदलून हिंदुत्व स्वीकारल्याचं काहीजण म्हणत आहे. पण मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, मी मराठीबरोबरच हिंदू देखील आहे. मराठीला कुणी नख लावण्याचा प्रयत्न केला, तर त्याला सोडणार नाही आणि माझ्या धर्माला कुणी धक्का लावला, तरी त्याच्या अंगावर जाईन. या देशात राहणारा प्रत्येक मुसलमान हा भारतीयच असल्याचं माझं ठाम मत आहे. भाषा कोणत्याही धर्माची नाही, तर प्रांताची असते. प्रत्येकाने आपला धर्म हा घरातच ठेवला पाहिजे. त्यामुळे आमच्या आरतीमुळं कुणाला त्रास होणार नसेल, तर मशिदीने लावलेल्या भोंग्यामुळे नमाजाचा त्रास का व्हावा, असा सवाल त्यांनी केला. 

त्याआधी झेंड्याचा रंग बदलून भगवा करण्याबद्दल राज ठाकरे म्हणाले की, पक्षाचा झेंडा बदलणारा मनसे हा काही देशातील पहिला पक्ष नाही. याआधी जनसंघाने देखील पक्षाचं नाव आणि झेंडा बदलला होता. पक्ष स्थापन केल्यानंतर सोशल इंजिनीअरिंग म्हणून तिहेरी रंगाचा झेंडा असावा, असं मला काहींनी सांगितलं होतं. माझा त्याला तीव्र विरोध होता. पण तरिही नाईलाजाने हा झेंडा स्वीकारला होता. पण आताचा हा झेंडा माझ्या मनातला झेंडा आहे. हा त्याचवेळी मी बनवला होता. परंतु तो बाजूला ठेवावा लागला. आता नव्याने पक्ष बांधणी करताना हा झेंडा बाहेर काढला. शिवरायांचा झेंडा देखील भगवाच होता. तरीही त्यांनी सर्व धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन राज्य स्थापन केलं. महाराष्ट्र एकीकरण समितीचा झेंडाही भगवाच होता. मग माझ्या झेंड्याचा रंग भगवा झाल्यावर इतरांना त्रास का व्हावा, असं राज म्हणाले.

एनआरसी आणि सीएएवर बोलताना राज म्हणाले, बांगलादेश आणि पाकिस्तानमधून सातत्याने लोकं येताहेत. त्यांना आपण का पोसायचं? आपले पोलीस ब्रिटनमधून आलेल्या नागरिकांना व्हिजा विचारतात, पण आजूबाजूच्या देशातून आलेले नागरिक आपले पासपोर्ट फेकून बिनधास्तपणे देशात राहत आहेत. या बांगलादेशी आणि पाकिस्तानी नागरिकांना भारतातून आधी हाकलून द्या अशी आमची मागणी असून त्यासाठी आम्ही केंद्र सरकारला पाठिंबा द्यायला तयार आहोत. त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोर्चा काढून विरोधकांच्या मोर्चाला उत्तर देईल, असं म्हणत राज ठाकरे यांनी एनआरसीचा विरोध करणाऱ्यांना एकप्रकारे आव्हानच दिलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या