Advertisement

...तर शिवसेनेचा जीएसटीला विरोध


...तर शिवसेनेचा जीएसटीला विरोध
SHARES

'जीएसटीमुळे भिकेचा कटोरा घेऊन सरकारच्या दारी उभं रहावं लागणार असेल तर शिवसेनेला पुर्नविचार करावा लागेल', असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी केलं. जीएसटीसंदर्भात शिवसेना भवनमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे आमदार आणि नगरसेवक यांची बैठक झाली त्यावेळी त्यांनी जीएसटीला विरोध करत भाजपावर जोरदार टीका केली. 

'ज्यावेळी जीएसटी प्रत्यक्षात अंमलात येईल त्यावेळी शिवसेना काटेकोरपणे बघेल की, जर लाचार होऊन राज्य आणि केंद्र सरकारच्या दरबारी जाण्याची वेळ पालिकेवर येणार असेल तर, शिवसेनेला विचार करावा लागेलट, असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. सुरूवातीपासून आमची हीच मागणी आहे की, महापालिकेची स्वायत्तता अबाधित राहिली पाहिजे. जीएसटीमुळे मुंबई महापालिकेच्या जकातीतून येणारा महसूल बंद होणार आहे. तर केंद्राकडून येणारा निधी राज्य सरकारने थेट महापालिकांना देणे गरजेचे आहे. त्यामुळे जीएसटीसाठी होणाऱ्या अधिवेशनात भूमिका मांडून पाठपुरावा करा, असा आदेश उद्धव ठाकरे यांनी आपल्या मंत्र्यांना आणि आमदारांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जीएसटीबाबत शिवसेनेने घेतलेली भूमिका आता भाजपाला डोईजड होणार आहे. जीएसटीसाठी आवश्यक विधेयक संमत करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावलं आहे. मात्र हे विधेयक विधानसभेत आणि विधान परिषदेत मंजूर करण्यासाठी शिवसेनेची साथ मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आता शिवसेना अधिवेशनात काय भूमिका घेते, हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल.

जीएसटीमुळे मुंबईची सुरक्षा धोक्यात?

जकात नाक्यामुळे प्रत्येक गाड्यांची तपासणी होत होती. त्यामुळे मुंबईत केव्हा, काय दाखल होते, याची इत्यंभूत माहिती प्रशासनाकडे जमा होत होती. एका अर्थाने मुंबईची सुरक्षादेखील राखली जात होती. परंतु जीएसटी लागू झाल्यानंतर मुंबईतील जकात नाकेही बंद होतील. त्यामुळे मुंबईत बाहेरून येणाऱ्या वाहनांवर कुणाचा अंकुश राहिल?  या गाड्यांची तपासणी न होताच त्या शहरात येतील, त्याने मुंबईच्या सुरक्षेला धोका पोहचू शकेल. तेव्हा या गाड्यांच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्र किंवा राज्य सरकार घेणार का? तसे असल्यास यावर सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही या बैठकीत करण्यात आली.  

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा