Advertisement

Video: माझे व्हिडिओ मतदारांसाठी रिमाइंडर काॅल- राज ठाकरे


SHARES

मी दाखवत असलेले भाजपाची पोलखोल करणारे व्हिडिओ केवळ व्हिडिओ नसून मतदारांसाठी रिमाइंडर काॅल असल्याचं वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केलं. इश्यू क्या है? म्हणत मुंबई लाइव्हने विचारलेल्या प्रश्नांना राज यांनी आपल्या नेहमीच्या बेधडक शैलीत उत्तरं दिली.

‘ए लाव रे तो व्हिडिओ’ या राज यांच्या एका वाक्याने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार उभा न करता पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात सभा घेण्यामागचं नेमकं कारण काय? असा प्रश्न विचारला असता, राज यांनी मोदी आणि शहांवर तोंडसुख घेतलं. ते म्हणाले, ‘‘सत्तेवर येण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी सर्वसामान्यांना जी स्वप्नं दाखवली, जी आश्वासने दिली होती. ती सर्व आश्वासने मोदी सरकार सत्तेत आल्यापासून विसरलं. या ५ वर्षांत जनतेला मिळाले ते केवळ खोटे आकडे आणि थापा. जनता भलेही या गोष्टी विसरली असेल, परंतु मी विसरलेलो नाही. याच गोष्टी मी माझ्या व्हिडिओ प्रेझेंटेशनच्या माध्यमातून जनतेला समजावून सांगतोय.’’


भाजपाने अच्छे दिन आएंगें म्हणत २०१४ मध्ये प्रचार केला होता. परंतु मोदी आणि शहा आताच्या प्रचारांत ते ना स्टार्टअप इंडियाबद्दल बोलताहेत ना मेक इन इंडियाबद्दल बोलताहेत आणि ना वर्षाला २ कोटी रोजगार देण्याबद्दल बोलत आहेत. तुम्ही यांची आताची भाषणं बघा आणि पूर्वीची बघा. आता तर पुलवामात शहीद झालेल्या सैनिकांच्या नावाने ते मतं मागाहेत. मग कुठं गेले अच्छे दिन? असा प्रश्न उपस्थित करत राज यांनी या दोघांना टार्गेट करण्यामागचं नेमकं कारण स्पष्ट केलं.

तुम्ही सरकारच्या खराब कामगिरीवर नाराज आहात की खोटारडेपणावर? या प्रश्नावर राज म्हणाले की, दोन्ही गोष्टींवर. मोदींनी स्वच्छ भारत अभियानाला सुरूवात केली. पण त्यांनी दत्तक घेतलेल्या गावात स्वच्छतेच्या नावाने किती बोंब आहे, हे मी व्हिडिओतून दाखवलं. मोदी म्हणाले आम्ही आठवड्याभरात देशभरात साडेआठ लाख शौचालयं बांधली. याचा अर्थ एका दिवसात ८४ आणि एका सेकंदात ७ शौचालयं. हा तर गिनिज बुक रेकाॅर्ड आहे. या मागची सतत्या तपासून मी मोदींच्या खोटारडेपणाची माझ्या सभांतून चिरफाड केली.

या सरकारच्या काळात सर्वोच्च न्यायालय, रिझर्व्ह बँक आणि सीबीआयसारख्या स्वतंत्र संस्थांच्या स्वायतत्तेत हस्तक्षेप करण्यात आला. काळा पैसा तर देशात आला नाहीच, पण सरकारी बँकांना बुडवून असंख्य उद्योगपती देशाबाहेर पळाले. असं म्हणत राज यांनी राफेल घोटाळा, पाकिस्तानी पंतप्रधानांसोबतच मोदींचं नरमाईचं धोरण यांसारख्या असंख्य प्रश्नांवर आपली रोखठोक मतं मांडली.



हेही बघा-

इश्यू क्या है ? मुंबईत पॉवरफुल लिडर्सचीच कमतरता, काय म्हणाले देवरा? पाहा व्हिडिओ

इश्यू क्या है ? महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देणं आवश्यक, काय म्हणाल्या उर्मिला मातोंडकर, बघा व्हिडिओ



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा