Advertisement

इकबाल सिंह चहल यांची आयुक्तपदावरून हकालपट्टी करावी - सोमय्या

महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्याच काळात मुंबई महानगरपालिकेत सर्वाधिक भ्रष्टाचार झाला.

इकबाल सिंह चहल यांची आयुक्तपदावरून हकालपट्टी करावी - सोमय्या
SHARES

महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांच्या घोटाळ्यांचा छडा लवण्याचा वसा विरोधी पक्ष भाजपानं हाती घेतला आहे. त्यानुसार, भाजप नेते किरीट सोमय्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या घोटाळ्यांचा उलघडा करत आहेत. यांच्या पाठोपाठ आता किरीट सोमय्या यांनी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांना लक्ष्य केलं आहे.

महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्याच काळात मुंबई महानगरपालिकेत सर्वाधिक भ्रष्टाचार झाला. ते आयुक्त पदावर असल्यास निष्पक्ष चौकशी होणार नाही. त्यामुळं सर्वप्रथम इकबाल सिंह चहल यांची आयुक्तपदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबत भाष्य केलं.

''प्राप्तीकर विभागाचे अधिकारी मागील ३ दिवसांपासून यशवंत जाधव यांच्या घरी ठाण मांडून आहेत. यशवंत जाधव हे मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेचे फंड कलेक्टर होते. मी गेल्या ४ ते ६ महिन्यांपासून त्यांच्या भ्रष्टाचाराचा पाठपुरावा करत आहे. यशवंत जाधव यांच्या मुंबईत १७ इमारती असून, त्यांच्याकडे तब्बल १०० कोटी रूपयांपेक्षा अधिकची संपत्ती असल्याचा अंदाज आहे'', असे सोमय्या यांनी म्हटलं.

याशिवाय, सोमय्या यांनी याप्रकरणात विमल अग्रवाल या आणखी एका व्यक्तीचं नाव उघड केलं. विमल अग्रवाल हा महापालिकेचा माफिया कॉन्ट्रॅक्टर होता. महापालिकेतील माफिया कॉन्ट्रॅक्टर आणि फिक्सर कोण होते, हे लवकरच समोर येईल. याच विमल अग्रवाल याच्यावर मुंबई पोलिसांना निकृष्ट दर्जाची बुलेटप्रुफ जॅकेट पुरवल्याचा आरोप आहे. तसंच, खंडणी आणि बेटिंगच्या प्रकरणांमध्येही विमल अग्रवालचा सहभाग होता. हे सगळं लवकरच बाहेर येईल, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले.

हा तपास यशवंत जाधव यांच्यापासून सुरु झालाय. पण या प्रकरणात ईडी आणि कंपनी मंत्रालयानेही सहभागी झाले पाहिजे, हा माझा आग्रह आहे. निवडणूक आयोगाने वर्षभरापूर्वीच यशवंत जाधव यांच्या गैरप्रकारांचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला होता. मात्र, उद्धव ठाकरे यांनी यशवंत जाधव यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांच्याकडून फक्त हप्ता वाढवून घेतला. यशवंत जाधव यांनी आर्थिक गैरव्यवहारासाठी बिटकॉईन आणि अन्य क्रिप्टोकरन्सीचा वापर केल्याचीही माहिती समोर आल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा