Advertisement

किरीट सोमय्या यांची मुंबई पोलिसांविरोधातच तक्रार

ठाकरे सरकारच्या पोलिसांनी गुंडगिरी केली असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

किरीट सोमय्या यांची मुंबई पोलिसांविरोधातच तक्रार
SHARES

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलिसांविरोधातच तक्रार दाखल केली आहे. कोल्हापूर दौऱ्यात अडथळा आणल्यानं त्यांनी ही तक्रार दाखल केली आहे. किरीट सोमय्या यांनी मुलुंडच्या नवघर पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केली आहे.

२४ तासांत मुंबई पोलिसांनी माफी मागावी अशी आमची मागणी असल्याचं किरीट सोमय्या यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. उद्धव ठाकरे आणि शरद पवार अशा प्रकारे लोकशाही चालवणार आहेत का? असा सवालही यावेळी त्यांनी विचारला. तसंच कोल्हापूरच्या दौऱ्यावर जाण्याची घोषणादेखील त्यांनी केली.

“कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी असताना मला घरात कोंडून ठेवण्यात आलं. कायदेशीर नोटीस दिल्यावर जाऊ दिलं आणि त्यानंतर सीएसटीबाहेर मी जाऊ नये यासाठी ठाकरे सरकारच्या पोलिसांनी गुंडगिरी केली. म्हणून अधिकृत तक्रार करण्यासाठी मी आलो आहे,” असं किरीट सोमय्या यांनी यावेळी सांगितलं.

“मी आज कोल्हापूर जिल्हाधिकारी आणि एसपींना पुन्हा पत्र लिहिलं आहे. २० तारखेचा स्थगित झालेल्या दौऱ्यासाठी पुढील मंगळवार आणि बुधवारी जाणार आहे,” अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्यांचे आरोप करणारे किरीट सोमय्या हे महालक्ष्मी एक्स्प्रेसनं कोल्हापूरकडे जात होते. तेव्हा कराड रेल्वेस्थानकावर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं. यानंतर कराड इथं पत्रकारांशी बोलताना सोमय्या यांनी हसन मुश्रीफांवर आरोप केले होते. सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास कडक पोलीस बंदोबस्तात त्यांना मुंबईकडे रवाना करण्यात आलं.

किरीट सोमय्या ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या भ्रष्टाचाराविरोधात तक्रार नोंदवण्यासाठी कोल्हापूरला गेलेले. पण पोलिसांनी रोखल्यानं कराडहून परतलेल्या सोमय्या यांचं भाजपा कार्यकर्त्यांनी स्वागत केलं होतं.हेही वाचा

ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळातच अनेक ‘शक्ती कपूर’ - अतुल भातखळकर

अनिल परब आक्रमक, किरीट सोमय्यांविरोधात १०० कोटींचा दावा दाखल

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा