Advertisement

किशोरी पेडणेकर यांचा पत्ता कट?


SHARES

मुंबई - महापालिकेतील शिवसेना नगरसेविका किशोरी पेडणेकर यांना बदलेल्या प्रभाग आरक्षणाचा फटका बसलाय. त्यामुळे त्यांनी आजूबाजूच्या प्रभागांमधून आपली सेटिंग लावण्यास सुरुवात केली होती. परंतु त्यांच्या या प्रयत्नावर पाणी फेरले जात असून त्यांचे सर्वच मार्ग मातोश्रीने बंद केले आहेत. त्यांनी या वेळी निवडणूक लढवू नये, असा निरोपच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठवल्यामुळे पेडणेकर यांचा पत्ताच कट होणार आहे.

शिवसेना नगरसेविका किशोरी पेडणेकर या सध्या प्रभाग क्रमांक 191 मधून प्रतिनिधित्व करत आहेत. परंतु महापालिका 2017 च्या निवडणुकीच्या प्रभाग आरक्षण लॉटरीत पेडणेकर यांचा बहुतांशी मतदारसंघ असलेला नवीन प्रभाग 195 हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाला. त्यामुळे किशोरी पेडणेकर यांनी प्रभाग क्रमांक 194 आणि 199 मधून आपली वर्णी लावण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. मात्र, प्रभाग 194 मधून आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांच्यासह आमदार सुनील शिंदे यांचे बंधू आणि इतरही स्थानिक इच्छुकांची भर पडली. त्यामुळे त्यांनी प्रभाग 199 मध्ये प्रयत्न करण्यास सुरुवात केली. परंतु तिथेही शाखाप्रमुख काका कदम हे प्रमुख दावेदार असून त्यांची पत्नी निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. प्रभागांचे हे गणित जुळत नसतानाही पेडणेकर यांची प्रभागासाठी धावपळ सुरू होती. दरम्यान, किशोरी पेडणेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अशाप्रकारे आपल्याला कुठलाच आदेश आला नसल्याचे सांगितले. मात्र, पक्षप्रमुख जो आदेश देतील त्याचे पालन केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा