Advertisement

नगरसेवक ते खासदारपदाची झेप घेतील का मनोज कोटक?


नगरसेवक ते खासदारपदाची झेप घेतील का मनोज कोटक?
SHARES

अनेक दिवसांपासून ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ हा सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरला होता. त्यात अखेर मुंबई महापालिकेतील भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. मुंबई महापालिकेतून थेट लोकसभेत जाण्याची संधी त्यांना देण्यात आली आहे. सध्या किरीट सोमय्या हे या मतदारसंघाचं नेतृत्व करत असून शिवसेनेच्या नाराजीमुळंच सोमय्या यांचा पत्ता कापण्यात आला.

थेट लोकसभेपर्यंत
सध्या मनोज कोटक हे मुंबई महापालिकेत भाजपाचे गटनेते आहेत. मुलुंड पश्चिम मतदारसंघातून ते मुंबई महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले आहेत. तसंच स्थायी समितीचे सदस्य म्हणूनही ते कार्यरत आहेत. किरीट सोमय्या यांचा पत्ता कट झाल्यानंतर कोटक यांना ईशान्य मुंबई मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. महापालिकेतून थेट लोकसभेपर्यंत पोहोचण्याची संधी कोटक यांना देण्यात आली आहे. यापूर्वी २०१४ साली त्यांना भांडुपमधून विधानसभेसाठी उमेदवारी देण्यात आली होती. परंतु त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

गुजराती समाजावर प्रभाव
मनोज कोटक हे मूळचे मध्य प्रदेशचे रहिवासी आहेत. परंतु मुंबईतील गुजराती आणि राजस्थानी नागरिकांमध्येही त्यांचा प्रभाव आहे. सोमय्या आणि शिवसेनेत वाद झाले असले तरी मनोज कोटक हे शिवसेनेच्या जवळचे मानले जातात. तसंच शिवसेनेशी जवळीक असल्यामुळे शिवसेनाही त्यांच्यासाठी जोर लावणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुख्यमंत्र्यांशी जवळीक
मनोज कोटक हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीही दोन वेळा कोटक यांना विधान परिषदेवर पाठवण्याचे प्रयत्न केले होते. परंतु त्यात त्यांना अपयश आलं होतं. कोटक यांनी यापूर्वी शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाचीही धुरा स्वीकारली होती. तसचं ते सुधार समितीचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा