Advertisement

राहुल शेवाळेंना पुन्हा मिळेल का मराठी मतांचा लाभ?


राहुल शेवाळेंना पुन्हा मिळेल का मराठी मतांचा लाभ?
SHARES

मुंबईतल्या दक्षिण मध्य मुंबईत यावेळी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत दुहेरी लढत पहायला मिळणार आहे. या मतदारसंघातून काँग्रेसतर्फे एकनाथ गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. तर शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे  पुन्हा नशीब आजमावणार आहेत. मनसेने निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे शिवसेनेचा मार्ग सुखकर झाला असला, तरी वंचित आघाडी ही दोघांसाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत.

शिवसेनेचा बालेकिल्ला
१९९१ पासून आजपर्यंत एक अपवाद वगळता मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. या मतदारसंघातून शिवसेनेचे नेते मोहन रावले हे ५ वेळा दिल्लीत निवडून गेले आहेत. मात्र २००९ मध्ये काँग्रेसचे जायंट किलर माजी खासदार एकनाथ गायकवाड यांनी शिवसेनेच्या किल्ल्याला खिंडार पाडलं. याच पराभवचे उट्टे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत खासदार राहुल शेवाळेंनी काढत, दिल्ली दरबारी पुन्हा भगवा फडकवला. आता २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत या दोघांमध्येच पुन्हा एकदा सामना रंगणार आहे. शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी २०१४ च्या मोदी लाटेत काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांचा एक लाख ३८ हजार १८० मतांनी पराभव केला होता.

मतदारसंघाची ओळख
निवडणूक आयोगाने २००९ मध्ये मतदारसंघांची पुनर्रचना केली. या रचनेमुळे दक्षिण मध्य मुंबई या मतदारसंघात लालबाग-परळ भागातील कामगार, शिवाजी पार्क-हिंदू कॉलनी भागातील मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय तसंच धारावीतील झोपडपट्ट्यांमधून राहणारे नागरिक असे विविध आर्थिक स्तरातील मतदार आले आहेत. अशा या मतदारसंघात धारावी पट्ट्यातील एकगठ्ठा मतांच्या जोरावर काँग्रेसचे एकनाथ गायकवाड २००४ आणि २००९ ची निवडणूक जिंकले होते.

नगरसेवक ते खासदार 
चेंबूर परिसरात लहानाचे मोठे झालेले राहुल शेवाळे काॅलेजच्या दिवसांपासून शिवसेना पक्षात कार्यरत आहे. प्रथम शाखाप्रमुख, त्यानंतर नगरसेवक, ३ वेळा महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आणि खासदार असा त्यांचा प्रवास राहिला आहे. या प्रवासात त्यांचा दांडगा जनसंपर्क, ज्येष्ठ नागरिकांबाबत असलेला आदर आणि नागरिकांच्या मदतीसाठी धावून येणारा नेता म्हणून त्यांची ओळख बनली आहे. तसंच आंतरराष्ट्रीय मानांकन असलेलं ISO प्रमाणपत्र मिळालेलं देशातील पहिला खासदार म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.

उद्धव ठाकरेंचे विश्वासू
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विश्वासूपैकी एक म्हणून खासदार राहुल शेवाळे ओळखले जातात. उद्धव ठाकरे यांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी शेवाळे हे व्यवस्थित पार पाडात आले आहेत. मग ती महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्षपदाची जबाबदारी असो, की खासदारकीची शेवाळे यांनी कायम उद्धव ठाकरे यांचं मन जिंकलं आहे. त्याच बरोबर ज्या वेळी भाजपा आणि शिवसेनेचे संबध ताणले गेले त्यावेळी भाजपाच्या बड्या नेत्यांकडून उद्धव ठाकरेंवर टीका सुरू असतानाशेवाळे यांनी सर्व टिकाकारांना पत्रकार परिषद घेऊन अंगावर घेतलं होतं. मुंबईच्या अणुशक्ती नगर इथून नगसेवक म्हणून निवडून आलेले शेवाळे यांचं शिक्षण सिव्हिल इंजिनिअरिंगपर्यंत झालेलं आहे.

#MLviews

 राहुल शेवाळं यांना गेल्या निवडणुकीप्रमाणं या निवडणुकीतही यश मिळेंल, असंच दिसतंय. यावेळी त्यांच्यासमोर एकनाथ गायकवाडांसारखा अनुभवी उमेदवार असला तरी त्यांचं वय, अंतर्गत बंडखोरीचा फायदा शेवाळेंनाच होताना दिसत आहे. तसंच मतदारसंघातून त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता त्यांचंच पारडं जड वाटत आहे. फटका बसल्यास त्यांना वंचित बहुजन आघाडीच्या मतांचाच बसू शकतो.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा