Advertisement

महापालिका सभागृहात उशिरा आले, सेनेच्या नगरसेवकांना मिळाली 'कारणे दाखवा नोटीस'

महापौर विश्वनाथ महाडेश्वर नियोजित वेळेवर सभागृहाचं कामकाज सुरू करत नसल्याने वेळेवर उपस्थित राहणाऱ्या नगरसेवकांना ताटकळत बसावं लागतं. या उलट, एकदा विलंब झाल्यावर सभागृह नेते जाधव यांनी नगरसेवकांना थेट नोटीस पाठवल्याने शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

महापालिका सभागृहात उशिरा आले, सेनेच्या नगरसेवकांना मिळाली 'कारणे दाखवा नोटीस'
SHARES

सोमवारी झालेल्या महापालिका सभागृहात शिवसेनेचे नगरसेवक उशिरा हजर राहिल्याने या सभेला वेळेवर उपस्थित न राहणाऱ्या नगरसेवकांना सभागृह नेते यशवंत जाधव यांनी नोटीस पाठवली. या नोटीशीत त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी स्वरूपात खुलासा करण्याच्या सूचना केल्या आहेत.

महापौर विश्वनाथ महाडेश्वर नियोजित वेळेवर सभागृहाचं कामकाज सुरू करत नसल्याने वेळेवर उपस्थित राहणाऱ्या नगरसेवकांना ताटकळत बसावं लागतं. या उलट, एकदा विलंब झाल्यावर सभागृह नेते जाधव यांनी नगरसेवकांना थेट नोटीस पाठवल्याने शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.


का दिली नोटीस?

महापालिकेची सर्वसाधारण सभा सोमवारी पार पडली. दुपारी अडीच वाजता सभागृह असताना प्रत्यक्षात ४ वाजता कामकाजाला सुरूवात झाली. मात्र सभागृह सुरु झालं तेव्हा शिवसेनेच्या ८३ सदस्यापैकी केवळ २० ते २५ नगरसेवक सभागृहात उपस्थित होते. विरोधी पक्ष नेते रवी राजा यांच्या निवेदनानंतर अवघ्या १५ मिनिटांत सभागृहाचं कामकाज महापौरांनी गुंडाळलं. सभागृह संपेपर्यंत बहुतांश नगरसेवक उपस्थित होते.

तरीही सभागृहाचं कामकाज संपल्यानंतर संख्याबळाअभावी कामकाज करता आलं नाही, असं कारण देत सभागृनेते यशवंत जाधव यांनी सेनेच्या 'लेट लतीफ' नगरसेवकांना नोटीस जारी केली. सोमवारी सभागृहात उपस्थित राहण्यास विलंब का झाला? याचा लेखी खुलासा थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यास सांगितलं आहे.



सहनशीलतेचा कडेलोट

आतापर्यंतच्या महापालिका सभागृह आणि समित्यांच्या सभांना शिवसेना सदस्य वेळेवर उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारी येत होत्या. परंतु सोमवारी याचा कडेलोट झाल्यानंतर सभागृहनेते यशवंत जाधव यांनी ही नोटीस बाजावल्याची माहिती दिल्याची खात्रीलायक सूत्रांनी दिली.

सभागृहात उशिरा येणाऱ्या काही सदस्यांनी नंतर येऊन स्वाक्षरी केल्यामुळे महापालिका चिटणीस विभागाच्या कर्मचाऱ्यांनाही याप्रकरणी जाब विचारण्यात आला आहे.


नोटीस मिळाल्याची कबुली

अशा प्रकारची नोटीस आपल्याला मिळाल्याची कबुली सेनेच्या नगरसेवकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे. मुळात समित्यांच्या बैठकांमध्ये तसेच सभागृहात नगरसेवकांना बोलू दिलं जात नाही. बऱ्याच वेळा बोलण्यासाठी परवानगी मागूनही बोलण्यास दिलं जात. एवढंच काय तर कोणत्या विषयावर तुम्ही काय बोलणार हे आधी सांगा, असं सभागृहनेते सांगतात. 


आगीत तेल

त्यांच्या परवानगीशिवाय सभागृहात आम्ही बोलूच शकत नाही. त्यातच महापौर दुपारी अडीचचं सभागृह हे चार ते साडेचार वाजता सुरू करतात. त्यामुळे सभागृहात केवळ हजेरी लावण्यासाठीच नगरसेवकांना यावे. मुळात नगरसेवकांना बोलायालाच देत नसल्याने आधीच सेनेच्या नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यात आता या नोटिसने तर आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केल्याची भावना नगरसेवकांनी व्यक्त केली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा