आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं १२५ उमेदवारांची पहिली यादी मंगळवारी जाहीर केली. नवी दिल्लीतील भाजपाच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत भाजपा नेते अरुण सिंह यांनी ही यादी सादर केली. या यादीत ५२ विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली असून १२ विद्यमान आमदारांच्या नावांना वगळण्यात आलं आहे.
या यादीनुसार काही महत्त्वांच्या मतदारसंघांपैकी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून उतरणार आहेत. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात दक्षिण कराडमधून अतुल भोसले यांना उतरवण्यात आलं आहे.
कसबा पेठेतून पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याआधी जागेवरुन खासदार गिरीश बापट ५ वेळा निवडून आले आहेत. अपेक्षेनुसार साताऱ्यातून शिवेंद्रराजे भोसेल यांना, तर लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवाय वडाळ्यातील वादग्रस्त जागेवर कालिदास कोळंबकर यांना आणि बेलापूरमधून मंदा म्हात्रे यांना तिकीट देण्यात आलं आहे.
भाजपच्या पहिल्या यादीत भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचं नाव वगळण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपध्ये आलेले माजी मंत्री गणेश नाईक यांचं नावही पहिल्या यादीतून वगळण्यात आलं आहे. यंदा १२ मतदारसंघांची आदलाबदल करण्यात आल्याचंही सांगण्यात आलं आहे.
हेही वाचा-
मुख्यमंत्र्यांविरोधात खटला चालणार, प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याचा आरोप
मनसेचं इंजिन चार्ज, राज ठाकरेंनी केले २ उमेदवार जाहीर