Advertisement

जिथं पोलीस अडवतील तिथं आंदोलन, दि.बा.कृती समितीची भूमिका

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचंच नाव देण्यात यावं यासाठी स्थानिक भूमिपुत्रांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

जिथं पोलीस अडवतील तिथं आंदोलन, दि.बा.कृती समितीची भूमिका
SHARES

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचंच नाव देण्यात यावं यासाठी स्थानिक भूमिपुत्रांनी आक्रमक पवित्रा घेतला असून बेलापूर येथील सिडकोच्या मुख्यालयाला घेराव घालण्यासाठी हजारोच्या संख्येने प्रकल्पग्रस्त आणि इतर राजकीय पक्षांतील कार्यकर्ते सकाळपासून सिडको कार्यालयाकडे रवाना होत आहेत. आंदोलकांना जागोजागी पोलिसांच्या नाकाबंदीचा सामना करावा लागत असला, तरी पोलीस जिथं अडवतील, तिथंच ठिय्या आंदोलन करण्याची भूमिका दि.बा.पाटील कृती समितीने घेतली आहे.

नवी मुंबई (navi mumbai) येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाऐवजी दि. बा. पाटील यांचं नाव देण्यात यावं, अशी भूमिपुत्रांची मागणी आहे. या मागणीसाठी दि. बा. पाटील कृती समितीच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सिडको कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येत आहे. मोर्चामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी नवी मुंबईत तसंच नवी मुंबईत येणाऱ्या सर्व मार्गांवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा- नवी मुंबई विमानतळ : स्थानिकांचे सिडकोला घेराव आंदोलन

सोबतच पोलिसांनी सिडको मुख्यालयाकडे येणाऱ्या चारही मार्गांची बुधवारपासूनच नाकाबंदी सुरू केली होती. सीबीडी महालक्ष्मी चौक, बेलापूर किल्ला, पार्क हॉटेल, पालिकेचं जुनं मुख्यालय या चारही मार्गांनी येणारे सर्व रस्ते अत्यावश्यक वाहनांव्यतिरिक्त सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.

शीव-पनवेल मार्गावरील वाहतूक उरण फाटा ते खारघरपर्यंत बंद करण्यात आली आहे. जड वाहनांना सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत या भागात प्रवेशबंदी आहे. वाशी टोलनाक्यावरून येणारी सर्व वाहने शिळफाटा मार्गानेच वाहतूक करू शकणार आहेत. 

तसंच मुंबईहून पुणे-गोव्याकडे जाणाऱ्या वाहतुकीला ऐरोली, शिळफाटा मार्गे कळंबोलीहून वळवण्यात आलं आहे. तर पुण्याहून येणाऱ्या वाहनांना तळोजा येथील पुरुषार्थ पेट्रोलपंपापासून वळण घेऊन शिळफाटा मार्गे मुंबईत जाण्यासाठी मार्ग मोकळा करून दिलेला आहे. 

रस्ते बंद करण्यात आले असले तरी, पोलीस जिथं अडवतील, तिथंच ठिय्या आंदोलन करण्याची भूमिका कृती समितीने घेतली आहे. याआधी १० जून रोजी रायगड, नवी मुंबई, पालघर व ठाणे या चारही जिल्ह्यातील नागरिकांनी विमानतळाला दि. बा.पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी मानवी साखळी करून सरकारचं लक्ष वेधलं होतं. 

(project affect people and local residents agitation for name change of navi mumbai international airport )

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा