Advertisement

अ-राजकीय ‘मी’

निवडणुका म्हटल्या तर प्रचार आलाच. पण प्रचार कोणत्या पद्धतीनं करावा किंवा तो कशाप्रकारचा असावा यासाठी नवनव्या युक्त्या कोणी जर शोधत असेल तर. आजकाल प्रचारातही एक प्रकारची अनौपचारीकता, अराजकीय पद्धत आली आहे. दोन दिवसांपूर्वीच अक्षय कुमारनं पंतप्रधानांची अ-राजकीय मुलाखत घेतली म्हणे.

अ-राजकीय ‘मी’
SHARES

निवडणुका म्हटल्या तर प्रचार आलाच. पण प्रचार कोणत्या पद्धतीनं करावा किंवा तो कशाप्रकारचा असावा यासाठी नवनव्या युक्त्या कोणी जर शोधत असेल तर, त्यात काहीच वावगं नाही. आजकाल प्रचारातही एक प्रकारची अनौपचारीकता, अराजकीय पद्धत आली आहे. दोन दिवसांपूर्वीच अक्षय कुमारनं पंतप्रधानांची एक अ-राजकीय मुलाखत घेतली म्हणे. जागा औपचारीक, व्यक्ती औपचारीक पण मुलाखत मात्र अ-राजकीय. राजकारणाच्या, निवडणुकीच्या रणधुमाळीत अराजकीय मुलाखत हा काही पटण्यासारखा विषय नव्हताच. आपण स्वत: ती निवडणूक लढवणार आहोत, त्यांचा पक्षही निवडणुकीच्या रिंगणात आहे, त्यातच पक्षाचे सर्वात मोठे स्टार प्रचारक हे सर्वच अराजकीय, अनौपचारीक असू शकतं का हा यक्षप्रश्न आहेच म्हणा.

पंतप्रधानांच्या अनेक मुलाखती झाल्या. अनेक पत्रकारांनी त्या घेतल्या. काहींना प्रश्न सुचले तर काही तुम्ही किती तास झोपता हाच एक विचारून परत आले. अक्षय कुमारनंही अगदी तेच केलं. ‘तुम्ही किती तास झोपता?’, ‘आईला पैसे पाठवता का?’, ‘तुम्हाला संन्यास घ्यायचा होता का?’ याच प्रश्नांभोवती त्यांची अ-राजकीय मुलाखत घुटमळत होती. अ-राजकीय मुलाखतीच्या नावावर ही मुलाखत प्रसिद्ध झाली अनेक चर्चांचाही शुभारंभ झालाच. पंतप्रधान आणि अक्षय दोघंही ट्रोल झाले. एका अभिनेत्यानं दुसऱ्या अभिनेत्याची घेतलेली मुलाखत अशी या मुलाखतीला ट्रोल करण्यात आलं. 

यातही मुलाखत आणखी ट्रोल झाली ती म्हणजे तुम्ही आंबा खाता का? या प्रश्नानं. यावर पंतप्रधानांनीही उत्तर तसंच दिलं म्हणा. आंब्याशी आपल्याला प्रेम आहेच. पण लहानपणी आपल्याकडे आंबे खायला पैसे नसायचे. आपण बागेत जायचो आणि झाडावरचे आंबे तोडून खात असू. झाडावर पिकलेलेच आंबे खायला आपल्याला आवडतात असं साधसुध उत्तर पंतप्रधानांनी देऊन टाकलं. आपल्या त्वचेला चांगलं ठेवण्यासाठी ते एरंडेल तेलाचा वापर करतात, ते एलोपथिक उपचारापासून लांब राहतात, गरम पाणी घेतात, सर्दी झाल्यावर मोहरीचं तेल नाकात टाकतात, अशा अनेक गोष्टी यापूर्वीपासून आपल्याला ठाऊक आहेत. मग आता असं कारणं काय होतं की निवडणुकीच्याच कालावधीत ही अ-राजकीय मुलाखत झाली. 

ही अ-राजकीय मुलाखत असल्याचं सांगत अक्षय कुमारनं त्यांना वैयक्तित आयुष्यातले अनेक प्रश्न विचारले. असं असलं तरी यापूर्वी झालेल्या अनेक राजकीय कम्पेनमध्ये पंतप्रधानांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यात घडलेल्या अनेक बाबींची मदत घेतली होती. आपण लहानपणापासून करत असलेला व्यवसाय, जात अशा अनेक गोष्टींचा फायदा त्यांनी आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी केला. यापेक्षा अधिक महत्त्वाची सांगण्यासारखी एक गोष्ट म्हणजे पंतप्रधानांना काही प्रोटोकॉल फॉलो करावा लागतो. परंतु हल्ली तसं होताना अजिबातच दिसत नाही.

अनेकदा ते आपल्या आईला भेटायला जाण्यापूर्वी त्या ठिकाणी माध्यमांचे प्रतिनिधी उभे असताता. आता त्यांना ही माहिती कशी मिळते किंवा कोण देतं हे त्यांनाच ठाऊक. असो... पण मुलाखतीत त्यांनी बोलताना त्यांना एक प्रश्न विचारला गेला की तुम्ही तुमच्या आईला कधी पैसे देता का. यावर त्यांनी उत्तरही मजेदारचं दिलं. आई आपल्यालाच दर भेटीला सव्वा रूपया देते, असं त्यांनी सांगून टाकलं. आता या मागचं सत्य काय हे ज्याचं त्यालाच ठाऊक. २५ पैशाचं नाणं बंद होऊन बराच काळ लोटला. तर प्रत्येक भेटीला सव्वा रूपया कुठून त्यांना मिळतो? हा प्रश्न कोणाच्याच ध्यानीमनी आला नाही. 

त्यांची मुलाखत ही अ-‘राजकीय’ प्रचाराचा एक भाग असल्याचं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आजवर निरनिराळ्या मार्गांनी पंतप्रधानांचा आणि त्यांच्या पक्षाचा खुलेआम प्रचार करण्यात आला आहे. बाल नरेंद्र हे पुस्तक असो किंवा त्यांच्यावर काढण्यात आलेली बायोपिक असो किंवा वेब सीरिज असो, अशा अनेक पद्धतीनं वैयक्तीक आयुष्याचा आणि त्यांच्या राजकीय आयुष्याचा अप्रत्यक्षपणे प्रचार केलाच गेलाच. आचारसंहितेत निवडणूक आयोगाला उशीरा का होईना पण जाग आली. त्याबद्दल त्यांचे आभार मानावेच लागतील. आता देशाच्या पंतप्रधानांच्या मुलाखतीला तेही निवडणुकीच्या कालावधीत घेतलेल्या मुलाखतीला अराजकीय मुलाखत कसं म्हणावं हे समजण्यापलिकडलंच आहे.




हेही वाचा - 

बोल मुंबई: मागील ५ वर्षांत महागाई आणि भ्रष्टाचार कमी झालाय का? मुंबईकरांचं मत काय? बघा व्हिडिओ

बोल मुंबई: यंदा मोदी लाट नाही, तरीही... बघा व्हिडिओ



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा