१४ बंडखोरांची शिवसेनेतून हकालपट्टी, मुंबईच्या बंडखोरांचा समावेश नाही

१४ विधानसभा मतदारसंघात पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी करणाऱ्या १९ शिवसेना पदाधिकाऱ्यांवर मंगळवारी कारवाई करून त्यांना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवला आहे.

SHARE

विधानसभा निवडणुकीला अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले असून सर्व राजकीय पक्षांचे उमेदवार आपला प्रचार जोरदार करत आहेत. सर्वाधिक मतांनी विजयी होण्यासाठी घरोघरी जाऊन मतदारांच्या समस्या जाणून घेत आहेत. मात्र, यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेमध्ये तिकिट न मिळालेल्या पदाधिकाऱ्यांनी काही ठिकाणी पक्षाच्याच अधिकृत उमेदवाराविरोधात तर काही ठिकाणी युतीमधील मित्रपक्षाच्या उमेदवारांविरोधात बंडखोरी केली आहे. या बंडखोरांवर कारवाई करत शिवसेनेनं त्यांना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवला.

१४ विधानसभा मतदारसंघ

शिवसेनेने नांदेड, हदगाव, चंदगड, बुलडाणा आदी १४ विधानसभा मतदारसंघात पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी करणाऱ्या १९ शिवसेना पदाधिकाऱ्यांवर मंगळवारी कारवाई करून त्यांना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. परंतु, यामध्ये मुंबई मधील वांद्रे पूर्व, कल्याण पूर्व, वर्सोवा येथील बंडखोरांचा समावेश नसल्याचं समजतं.

बंडखोरांची हकालपट्टी

मंगळवारी १४ विधानसभा मतदारसंघांतील बंडखोरांची शिवसेनेने हकालपट्टी केली.  यामध्ये नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील प्रकाश कौडगे, हदगाव विधानसभा मतदारसंघातील बाबूराव कदम कोहळीकर, सोलापूर मध्यमधील महेश कोठे, मोहोळ विधानसभेतील मनोज शेजवळ, चोपडामधील कैलास पाटील व इंदिरा पाटील यांचा समावेश आहे. गंगापूर विधानसभा मतदारसंघातील अण्णासाहेब माने व संतोष माने, बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील विजयराज शिंदे, सिंधुताई खेडेकर, अर्जुन दांडगे, चंदगड विधानसभा मतदारसंघातील अनिरुद्ध रेडेकर, कोल्हापूर उत्तर मधील कमलाकर जगदाळे, दुर्गेश लिंगराज, हातकणंगलेमधील संदीप दबडे, सिंदखेडमधील शानाभाऊ सोनवणे, जिंतूरमधील राम पाटील, पाथरीमधील डॉ. संजय कच्छवे आणि केज विधानसभा मतदारसंघातील अॅड. विशाल होबळे यांचा समावेश आहे.

'या' बंडखोरांवर कारवाई?

वांद्रे पूर्वमध्ये महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याविरोधात विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांनी, कल्याण पूर्व भाजपचे उमेदवार गणपत गायकवाड यांच्याविरोधात शिवसेनेचे माजी नगरसेवक धनंजय बोडारे, वर्सोवामध्ये शिवसंग्रामच्या भारती लव्हेकर यांच्याविरोधात शिवसेना नगरसेविका राजुल पटेल आदींनी बंडखोरी केलेली आहे. तसंच, घाटकोपर पश्चिम, कणकवली आदी ठिकाणीही बंडखोरी झालेली आहे. परंतु, त्यांच्याविरोधात शिवसेनेनं कारवाई केलेली नसून त्यांच्यासंदर्भात शिवसेना काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.हेही वाचा -

दहावी, बारावी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर, 'ह्या' तारखांना होतील परीक्षा

विधानसभा निवडणूक: ८० कोटींचा मुद्देमाल भरारी पथकाकडून हस्तगतसंबंधित विषय
ताज्या बातम्या