Advertisement

सत्य तर अजून बाहेर यायचंय- चंद्रकांत पाटील

खरं तर अनिल देशमुख यांनी नैतिकता जपत याआधीच मंत्रीपदाच्या खुर्चीवरून पायउतार होणं गरजेचं होतं. पण असो! उशीरा का होईना देशमुखांनी शहाणपण दाखवलं!

सत्य तर अजून बाहेर यायचंय- चंद्रकांत पाटील
SHARES

गृहमंत्री अनिल देशमुखांचा राजीनामा म्हणजे भाजपच्या आणखी एका लढ्याला मिळालेलं यश. जबाबदार विरोधी पक्षापुढं सरकार नमलं, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र भाजपने अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर दिली आहे. 

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी आज अखेर राजीनामा दिला. खरं तर अनिल देशमुख यांनी नैतिकता जपत याआधीच मंत्रीपदाच्या खुर्चीवरून पायउतार होणं गरजेचं होतं. पण असो! उशीरा का होईना देशमुखांनी शहाणपण दाखवलं! 

हा विजय सत्याचा आहे. सत्ताधाऱ्यांची चूक दाखवणं हेच विरोधकांचं काम आहे. विरोधकांनी पुराव्याच्या आधारेच आरोप केले होते. ते उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अधोरेखित झाल्यामुळेच देशमुखांना नमतं घ्यावं लागलं. आता ही चौकशी लवकरात लवकर पूर्ण होऊन सत्य जनतेसमोर यावे हीच इच्छा. 

देशमुखांचा राजीनामा माननीय उच्च न्यायालयाच्या निकालानंतरही झाला नसता, तो शरद पवारांच्या एका आदेशावर झाला. जोपर्यंत राजकारणात आणि समाजकारणात चुकेल त्याची शिक्षा हा पायंडा पडत नाही, तोपर्यंत लोकशाही सुदृढ होणार नाही.

हेही वाचा- राजीनामा दिला विषय संपला- नवाब मलिक

पंधरा दिवसांच्या सीबीआय चौकशीत अनेक विषय बाहेर येतील. वाझे एनआयए चौकशीत जे बोलले आहेत, ते तर अजून बाहेर यायचंच आहे. परंतु सामान्य माणसाचा न्यायव्यवस्थेवरून विश्वास उडेल अशा घटना गेल्या काही काळात घडल्या आहेत, असंही चंद्रकांत पाटील (chandrakant patil) म्हणाले.

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने कथित १०० कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

अनिल देशमुख यांनी मुंबईतील रेस्टाॅरंट आणि बारकडून दर महिन्याला १०० कोटी रुपये जमा करून देण्याचे निर्देश सचिन वाझे यांना दिले होते, असा दावा करत परमबीर सिंह यांनी या खंडणी प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी व्हावी, असे निर्देश देण्याची मागणी करणारी फौजदारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. या नंतर विरोधी पक्षाकडून सातत्याने देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. 

या प्रकरणावरील याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने १५ दिवसांत सीबीआयने प्राथमिक तपास पूर्ण करून गुन्हा दाखल करायचा की नाही याचा निर्णय घ्यावा, असे निर्देश दिले आहेत.

(maharashtra bjp president chandrakant patil reaction on anil deshmukh resignation)

हेही वाचा- अखेर अनिल देशमुखांचा गृहमंत्रीपदाचा राजीनामा!

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा