Advertisement

Uddhav Thackeray: महाराष्ट्रातील लाॅकडाऊन कधी उठवणार? मुख्यमंत्री म्हणाले…

राज्यातील कोरोनाची स्थिती अजूनही नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे लाॅकडाऊन उठवण्याची घाई करणार नाही, अशी भूमिका राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली.

Uddhav Thackeray: महाराष्ट्रातील लाॅकडाऊन कधी उठवणार? मुख्यमंत्री म्हणाले…
SHARES

राज्यातील कोरोनाची स्थिती अजूनही नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे लाॅकडाऊन उठवण्याची घाई करणार नाही, अशी भूमिका राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली. राज्यातील काही नेत्यांकडून लाॅकडाऊन उठवण्याची मागणी होत असताना मुख्यमंत्र्यांनी ही मागणी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली आहे. राज्यातील कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी आणि राहुल पंडित यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांनी नुकतीच एक बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी आपलं मत व्यक्त केलं.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यातील कोरोनाची स्थिती अजूनही नियंत्रणात आलेली नाही. ज्या ठिकाणी लाॅकडाऊन उठवण्यात आलं होतं, तिथं पुन्हा कडक लाॅकडाऊन करण्याची वेळ आली. अशी परिस्थिती निर्माण होता कामा नये. त्यामुळे संपूर्ण लाॅकडाऊन उठवण्याची घाई मी करणार नाही. लाॅकडाऊन टप्प्याटप्प्यानेच विचाराअंती उठवण्यात येईल. 

सध्या महाराष्ट्रात कोरोनाची पहिली लाट कायम आहे. या कोरोनाच्या लाटेनेच आपली कठीण परीक्षा घेतलेली आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येता कामा नये. कारण तसं झालं, तर ही दुसरी लाट कंबरडे मोडणारी ठरू शकेल. ही लाट कशी थोपवता येईल, यासाठी तयारी देखील सुरू करण्यात आली आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

हेही वाचा- महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येता कामा नये- उद्धव ठाकरे

शाळा आणि कार्यालये सुरू करा असं बहुतांश लोकांचं म्हणणं आहे. लाॅकडाऊनचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य, गरीबांना बसल्याचं देखील मला ठाऊक आहे. परंतु शाळा-कार्यालये सुरू केली आणि कोरोनाचा संसर्ग पसरला तर आपल्या हाती काहीच राहणार नाही. अमेरिकेत शाळा सुरू झाल्यानंतर ९७ हजार मुलांना कोरोनाची लागण झाली. ६ महिन्यांच्या बाळापासून ते कोणत्याही वयाच्या व्यक्तिला कोरोना होऊ शकतो. त्यामुळे अति आत्मविश्वास बाळगून चालणार नाही. मिशन बिगीन अंतर्गत टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू राहील, असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, राज्यात रविवारी ८८३७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यभरात कोरोनाचे एकूण ४ लाख १७ हजार १२३ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होणाचं प्रमाण ७० टक्के एवढं आहे. आज ११ हजार १११ नविन रुग्णांचे निदान झालं असून सध्या १ लाख ५८  हजार ३९५ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३१ लाख ६२ हजार ७४० नमुन्यांपैकी ५ लाख ९५ हजार ८६५ नमुने पॉझिटिव्ह (१८.८४ टक्के) आले आहेत. राज्यात १० लाख ५३ हजार ८९७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३८ हजार २०३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात रविवारी २८८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३६ टक्के एवढा आहे.

हेही वाचा- मृत्यूदर शून्यावर आणणं हेच लक्ष्य- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा