Advertisement

सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद फडणवीसांवर..!


सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद फडणवीसांवर..!
SHARES

'भाजपा सरकार पारदर्शी सरकार' असा नारा देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देशातील सर्वाधिक गुन्हे नोंद असलेल्या मुख्यमंत्र्यांचा बहुमान मिळाला आहे. विश्वास बसत नाही ना, मात्र ही माहिती खरी आहे. असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही माहिती उघड झाली आहे .


फडणवीसांवर सर्वाधिक २२ गुन्हे

देशातील २९ राज्यांचे मुख्यमंत्री आणि दोन केंद्र शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सर्वाधिक २२ गुन्हे दाखल आहेत. यामध्ये तीन गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांच्यावर ११ गुन्हे दाखल आहेत तर, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर १० गुन्हे दाखल आहेत. एकूण ३१ पैकी २० मुख्यमंत्र्यांचा गुन्हेगारी रेकॉर्ड स्वच्छ आहे. आठ मुख्यमंत्र्यांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.


फक्त ३९ टक्के मुख्यमंत्री पदवीधर

देशातील ३९ टक्के मुख्यमंत्री हे पदवीधर असून १६ टक्के मुख्यमंत्री हे पदव्यूत्तर शिक्षण घेतलेले आहेत. सिक्कीमचे मुख्यमंत्री पी. के. चामलिंग यांच्याकडे डॉक्टरेट आहे. देशातील २९ राज्यांचे मुख्यमंत्री आणि दोन केंद्राशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री यांनी निवडणुकीत दिलेल्या प्रतिज्ञापत्राचा अभ्यास करत असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेच्या माध्यमातून अहवाल प्रसिद्ध केला.


२५ मुख्यमंत्री कोट्यधीश

भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्र्यांमध्ये आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू प्रथम क्रमांकावर असून त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार हे सर्वात गरीब मुख्यमंत्री ठरले आहेत. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे ३० लाख रुपयांची आणि जम्मू- काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्याकडे ५५ लाख रुपयांची संपत्ती आहे. देशातील १९ टक्के मुख्यमंत्र्यांची संपत्ती एक कोटी रुपयांपेक्षा कमी आहे. तर ५५ टक्के मुख्यमंत्र्यांची संपत्ती १ कोटी ते १० कोटींच्या घरात आहे. देशातील २५ मुख्यमंत्री कोट्यधीश असल्याचे या पाहणीतून समोर आले आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा