Advertisement

मुख्यमंत्री म्हणतात 'उत्तर भारतीयांसह इतर राज्यातून येणारे लोक मुंबईला महान बनवतात'


मुख्यमंत्री म्हणतात 'उत्तर भारतीयांसह इतर राज्यातून येणारे लोक मुंबईला महान बनवतात'
SHARES

'उत्तर भारतीय हे मुंबईची शान' असल्याचं वक्तव्य भाजपाच्या खासदार पुनम महाजन यांनी केलं होतं. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ’उत्तर भारतीय आणि इतर राज्यातून येणारे लोक मुंबईला महान बनवतात, त्यांनी मुंबईचा गौरव वाढवला', असे विधान केल्यानं वातावरण तापण्याची शक्यता आहे.


पुढे काय म्हणाले मुख्यमंत्री

घाटकोपरमध्ये शिक्षण महर्षी आय. डी. सिंह यांच्या नावाने उभारलेल्या चौकाचं उद्घाटन बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी “उत्तर भारतीय आणि इतर राज्यातून येणारे लोक मुंबईला महान बनवतात, त्यांनी मुंबईचा गौरव वाढवला,” असे वक्तव्य केलं आहे. ''भाषा माणसाला जोडतं त्यामुळं भाषा हे विवादाचं माध्यम होऊच शकत नाही. असा वाद निर्माण करणे चुकीचं आहे. मतांच्या राजकारणासाठी कोणी भाषिक वाद करू नये. मराठी संस्कृतीचा आम्हाला अभिमान आहेच. पण याच मराठी आणि मुंबईतील संस्कृतीबरोबर उत्तर भारतीय संस्कृतीही एकजीव झाली आहे.” असं मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणाले.

''मुंबईत काही लोक उत्तर भारतीय लोकांना लक्ष्य करत आहेत. परंतु आम्ही सक्षम असून, तक्रार करण्याआधीच अशा लोकांवर कारवाई सुरू आहे''' असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. मुंबई आणि उपनगरामध्ये फेरीवाला आणि मराठी फलकावरून मनसे आक्रमक झाली आहे. त्यांनी ठिकठिकाणी आंदोलनं केली आहेत. मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांना जबर मारहाणही करण्यात आली असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या वक्तव्यावरून वाद उपस्थित होण्याची शक्यता आहे.


महाराष्ट्र उत्तर भारतीय आणि इतर राज्यातून येणाऱ्या लोकांमुळं महान होतो आहे, मुख्यमंत्र्यांचं हे म्हणणं हास्यास्पद आहे. परप्रांतातील लोक महाराष्ट्रात पोट भरण्यासाठी येतात. त्यांच्या राज्यात विकास न झाल्यामुळे ते आपल्या राज्यात येतात. आश्रित म्हणून येणारे हे लोक मुंबई, महाराष्ट्राला महान कसे बनवू शकतात? मुख्यमंत्री फडणवीस यांची भूमिका म्हणजे परप्रांतीयांच्या मतांसाठी खटाटोप आहे. यामागे दुसरा-तिसरा काही हेतू नाही. यापूर्वी हे काँग्रेस करत होती, आता हे करत आहेत. ‘पार्टी विथ द डिफरन्स’ वगैरे काही नाही. ‘सत्तेत असलेली लोक त्यांची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडत नाहीत म्हणून मनसेला मराठी माणसाचा, मराठी भाषेचा मुद्दा उचलावा लागत आहे.

- नितीन सरदेसाई, मनसे नेता

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा