Advertisement

‘नाईट कर्फ्यू’वर मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

नवं वर्ष, थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर गर्दी वाढून कोरोना संसर्ग फैलावू नये म्हणून मुंबईत नाईट कर्फ्यू लावण्यात येईल, असं म्हटलं जात आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी स्वत: खुलासा केला आहे.

‘नाईट कर्फ्यू’वर मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान
SHARES

मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या घटत असतानाच सोशल डिस्टन्सिंग न पाळता, मास्क न घालताच बेफिकीरीने घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. यामुळे कोरोनाचा (coronavirus) धोका पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हे पाहता नवं वर्ष, थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर गर्दी वाढून कोरोना संसर्ग फैलावू नये म्हणून मुंबईत नाईट कर्फ्यू लावण्यात येईल, असं म्हटलं जात आहे. खुद्द महापालिका आयुक्तांनीच तशी शिफारस केल्याने मुंबईकरांमध्ये (mumbai) चर्चा सुरू आहेत. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वक्तव्य केलं आहे.

रविवारी सोशल मीडियावरून जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी राज्यातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतानाच ‘नाईट कर्फ्यू’ वरही महत्त्वपूर्ण विधान केलं. ते म्हणाले, कोरोनाने तिकडे आपला अवतार बदलला आहे. काळाप्रमाणे त्याने त्याची गती वाढवली आहे. तिथे हीच भीती आहे की लॉकडाऊन नाही केला तर झपाट्याने पसरणारा व्हायरस गेल्या वेळेपेक्षा अधिक मोठा हाहाकार पसरवू शकेल.

युरोपमध्ये आणि इंग्लंडमध्ये आजपासून आधीपेक्षा कडक लॉकडाऊन (lockdown) जाहीर केला आहे. का करावा लागला? आता न्यू इयर येणार. जसं आपण शुभेच्छा देत नववर्षाचं स्वागत करणार तसंच तेही करणार. हा टप्पा तिथे गर्दीचा असतो. गर्दी टाळण्यासाठी त्यांनी लॉकडाऊन केलाय. 

अजूनही आपण धोक्याच्या वळणावर आहोत. नाईट कर्फ्यू, लॉकडाऊन कायद्याने लावू शकतो. पण, ते का करायचं? ७०-७५% लोकं चेहऱ्यावर मास्क घालून फिरत असतात. पण उरलेल्यांना मी सूचना देतो की आपणही ही बंधन पाळा.

हेही वाचा- होय, मुंबईकरांच्या हितासाठी मी अहंकारी- उद्धव ठाकरे

कारण यामुळे केवळ आपल्यालाच धोका निर्माण होतो असं नाही पण जे ७०-७५% लोकं सावधानता बाळगत आहेत त्यांना हा धोका होऊ शकतो, आपल्या कुटुंबियांना हा धोका होऊ शकतो. मला असं वाटतं की आजार आणि इलाजापेक्षा काळजी घेतलेली बरी.

पुन्हा एकदा सांगतो की नवीन वर्षाचं स्वागत करताना आपण सावध रहा. लग्नसराई सुरू झाली आहे, आपली प्रथा आहे की आमंत्रण घेऊन जायचं आणि "यायचं हं... सहकुटुंब सहपरिवार लग्नाला आलंच पाहिजे" असा आग्रह करायचा. आपल्या आप्तस्वकीयांना आमंत्रण द्या, कोरोनाला देऊ नका.

अनेक जण मला सांगत असतात की मी ज्यावेळी आपल्याशी बोलतो तेव्हा तुम्हाला सगळ्यांना आपल्या घरातीलच मोठा भाऊ, आपला कुटुंबीय बोलतोय असं वाटतं, मी तेच नातं कायम ठेऊ इच्छितो. मी जे आपल्याशी बोलेन आणि मी जे आपल्याशी बोलतो, मी एक शब्दही खोटं बोललो नाही आणि खोटं बोलणार नाही.

तुमचा आशीर्वाद आणि तुमच्या विश्वासाला तडा जाईल असं मी कदापी करणार नाही. मी ज्या खुर्चीवर बसलोय त्या खुर्चीचं महत्त्व मला माहीत आहे, या खुर्चीवर बसताना वैयक्तिक आवडनिवड ठेवून चालत नाही.

पुन्हा एकदा सांगतो की कोरोनाचा (covid19) धोका टळलेला नाही आणि तो टाळायचा असेल तर आपण कुठेही गाफील राहू नका, अनावश्यक ठिकाणी गर्दी करू नका, उगाच रात्री, संध्याकाळी एकत्र येऊन मास्क काढून बोलू नका, मास्क लावा, हात धुवा आणि अंतर ठेवा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केलं.

(maharashtra cm uddhav thackeray clarifies on night curfew during new year celebration in mumbai)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा