Advertisement

संकटाच्या छाताडावर चाल करून जायचंय- उद्धव ठाकरे

आजपर्यंत जसं आपण सहकार्य केलं तसच या संकटातसुद्धा आपण सहकार्य करा. मी पुन्हा एकदा आपल्या हिंमतीला, धैर्याला, जिद्दीला मानाचा मुजरा करतो. संकटाच्या छाताडावर चाल करून जायचं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

संकटाच्या छाताडावर चाल करून जायचंय- उद्धव ठाकरे
SHARES

आजपर्यंत जसं आपण सहकार्य केलं तसच या संकटातसुद्धा आपण सहकार्य करा. मी पुन्हा एकदा आपल्या हिंमतीला, धैर्याला, जिद्दीला मानाचा मुजरा करतो. संकटाच्या छाताडावर चाल करून जायचं आहे. या संकटाला धैर्याने सामोरे जाऊया या आणि त्यातून सही सलामत बाहेर पडूया, असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (maharashtra cm uddhav thackeray guide about do and dont during cyclone nisarga) यांनी जनतेला केलं. निसर्ग चक्रीवादळच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला फेसबुक लाइव्हद्वारे संबोधित केलं. त्यावेळी ते बोलत होते.

केंद्राचाही पाठिंबा

कोरोनाच संकट आहेच. एकामागून एक संकट येत आहे. निसर्ग आपली परीक्षा घेण्याचं सोडत नाही आहे. या परीक्षेमध्ये ताकदीने सामोरे जाऊन त्यातून बाहेर पडायचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या आपत्तीच्याप्रसंगी केंद्र सरकार राज्य शासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याचंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

घराबाहेर जाऊ नका

कोरोनाच्या संकटाला ज्याप्रमाणे आपण संयम, जिद्द आणि धैर्याने सामोरे  गेलो त्याप्रमाणे याही संकटाला आपण धैर्याने सामोरे जाऊ आणि सहीसलामत बाहेर येऊ असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री म्हणाले की, आपण राज्यात ३ तारखेपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणत पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करणार होतो. परंतु आता उद्या आणि परवाचा दिवस चक्रीवादळाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा, सावध राहण्याचा असल्याने नागरिकांनी दोन्ही दिवस घरीच सुरक्षित रहावं, दुकाने, उद्योग, आस्थापना पूर्णत: बंद ठेवाव्यात. कुणीही घराबाहेर जाऊ नये, असंही आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.

हेही वाचा- Cyclone Nisarga: पुढचे २ दिवस धोक्याचे, घराबाहेर पडू नका- उद्धव ठाकरे

चक्रीवादळात 'ही' घ्या काळजी!

  • मुख्यमंत्र्यांनी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कशाप्रकारे काळजी घ्यावी याची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, ग्रामीण शहरी भागात ज्या वस्तू आपल्या आजूबाजूला अशाच मोकळ्या किंवा सैल स्वरूपात ठेवण्यात आल्या असतील त्या घरात आणा किंवा बांधून ठेवा. जेणेकरून वादळातील वाऱ्याने त्या उडून जाऊन कुणालाही इजा होणार नाही. 
  • पूरसदृश्यस्थिती होणार नये याची काळजी घेण्यात आली आहेच परंतु दुर्देवाने मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे अशी परिस्थिती उद्भवलीच तर काही ठिकाणी वीजप्रवाह बंद होईल किंवा खबरदारीचा उपाय म्हणून वीजपुरवठा बंद करावा लागेल. त्यामुळे अशा परिस्थितीसाठी सज्ज राहण्याचे, पिण्याचे पाणी भरून ठेवा.
  • वादळाच्या काळात वीजेची उपकरणे वापरू नका, ज्या अनावश्यक गोष्टी असतील त्या बांधून ठेवा, अत्यावश्यक गोष्टींची सुसूत्रता ठेऊन त्या जवळपास ठेवा. मोबाईल चार्ज करून ठेवा, फोन, संवादाची उपकरणे सज्ज ठेवा. औषधे जवळपास ठेवा.
  • महत्वाचे दस्तऐवज एकत्र ठेवा, बॅटरी, पॉवरबँक, मोबाईल चार्ज करून ठेवा. कोणत्याही अफवा पसरवू नका आणि अफवांवर विश्वास ठेऊ नका. दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सूचना ऐका, पाळा.

सुरक्षितस्थळी जा

धोक्याच्या क्षेत्रातील नागरिकांना प्रशासन सुरक्षितस्थळी नेत आहे. त्यांना नागरिकांनी सहकार्य करावं, ते सांगत असलेल्या सुरक्षितस्थळी वेळेत जावं, ग्रामीण आणि शहरी भागात जर घर कच्चे असेल तर सुरक्षित जागा शोधून ठेवावी, तात्पुरत्या बांधलेल्या शेडमध्ये आधाराला अजिबात जाऊ नका, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.

शेड, मोडकळीला आलेल्या इमारती याचा अजिबात आश्रय घ्यायचा नाही. कुठे वायुगळती झाली असेल  किंवा केमिकल जर कुठे पडले असेल  तर तिकडे काय होतेय हे पहायला अजिबात जायचं नाही. असे काही होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परंतू  दुर्देवाने असं काही घडल्यास प्रशासन काळजी घेईल, नागरिकांनी तिकडं जाऊ नये. स्वत: सुरक्षित राहून जिथे मदत करता येणे शक्य आहे तिथे मदत करावी. यातून आपण होणारे नुकसान थोपवणं शक्य होईल, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा