Advertisement

मिरा-भाईंदर, वसई-विरारला मिळाले स्वतंत्र पोलीस आयुक्त

मिरा-भाईंदरमध्ये कुठल्याही प्रकारे गुंडागर्दी सुरू असेल, तर ती दहशत मोडून काढत तिथं पोलिसांचा दरारा निर्माण झाला पाहिजे, अशी अपेक्षा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

मिरा-भाईंदर, वसई-विरारला मिळाले स्वतंत्र पोलीस आयुक्त
SHARES

दरारा आणि दहशत या दोन शब्दांमध्ये मोठा फरक आहे. पोलिसांचा असतो तो दरारा आणि गुंडांची असते ती दहशत. मिरा-भाईंदरमध्ये कुठल्याही प्रकारे गुंडागर्दी सुरू असेल, तर ती दहशत मोडून काढत तिथं पोलिसांचा दरारा निर्माण झाला पाहिजे. सर्वसामान्य जनतेला पोलिसांची आदरयुक्त भीती आणि गुन्हेगारांना दहशत वाटली पाहिजे. सागरी सुरक्षेबरोबरच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून आदर्श , सुरक्षित व गतिमान अशी मिरा भाईंदर, वसई-विरार आयुक्तालयाची ओळख निर्माण करावी, अशी अपेक्षा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गुरूवार १ आॅक्टोबर २०२० रोजी मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. (maharashtra cm uddhav thackeray inaugurates mira bhayander and vasai virar police commissionerate)

पोलीस आयुक्तालयात मिरा-भाईंदरमधील ६ आणि वसई- विरार मधील ७ अशी एकूण १३ पोलीस ठाणी आहेत. याशिवाय मीरा-भाईंदरमध्ये खारीगाव आणि काशिगाव अशी २ तर वसई- विरारमध्ये पेल्हार, आचोळे, मांडवी, बोळिंज व नायगाव अशी ५ नवीन पोलीस ठाणी होणार आहेत. आयुक्तालयात ५ डीसीपी असणार आहेत. तर मिरा-भाईंदरमध्ये १ व वसई-विरारमध्ये २ झोन केले जाणार आहेत.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, मुंबईला लागूनच असलेलं हे शहर आता काळाच्या ओघात खूपच विस्तारलं आहे. मिरा-भाईंदर, वसई-विरार परिसरातील लोकसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मिरा-भाईंदरमधील लोकसंख्येने तर ५० लाखांचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे या शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय असावं, अशी मागणी सातत्याने होत होती. ती मागणी या निमित्ताने पूर्ण झाली असून या आयुक्तालयाला सदानंद दाते पहिले पोलीस आयुक्त म्हणून लाभले आहेत. या परिसरात कुणाकडे लक्ष द्यावं, कुणाचा बंदोबस्त करावा, हे तर उघड गुपीत आहे. परंतु या आयुक्तलयाच्या माध्यमातून स्थानिकांना धीर मिळाला पाहिजे. पोलिसांनी मित्रत्वाच्या भावनेने त्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत, अशी अपेक्षा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

हेही वाचा - “राज्यात सिनेमागृह, नाट्यगृह सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक”

ते पुढं म्हणाले, हे पोलीस आयुक्तालय मिरा-भाईंदर आणि वसई-विरारचं असलं तरी आजूबाजूच्या परिसरात गुंडागर्दी करणाऱ्यांवर वचक बसविण्यासाठी आयुक्तालय आहे. आम्ही विश्वासाने फार मोठी जबाबदारी दाते साहेब आपल्यावर सोपविली आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब मला म्हणायचे, दरारा आणि दहशत. पोलिसांचा असतो तो दरारा आणि गुंडांची असते ती दहशत, ही दहशत मोडून काढा. जर गुंडागर्दी चालू असेल तर ही दहशत मोडून काढली पाहिजे, त्या गुंडांसाठी पोलिसांचा दरारा पाहिजे.

उत्तर प्रदेशमध्ये जे घडलं, महिलांवर अत्याचार, हे नाही सहन होणार! केवळ मिरा-भाईंदर नाही तर महाराष्ट्रामध्ये कोणाची हिंमत होता कामा नये. अत्याचार करण्याचं तर सोडाच, पण माझ्या माता-भगिनींकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होता कामा नये, अशा पद्धतीचा कारभार मिरा-भाईंदरमध्ये पाहिजे. मिरा-भाईंदरचं नाव चांगल्या पद्धतीने केवळ राज्यातच नव्हे, तर देशभरात घेतलं जावं असा कारभार आपल्याकडून होवो, अशा शुभेच्छा उद्धव ठाकरे यांनी दिल्या.


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement