Advertisement

Maratha Reservation: मराठा समाजाला भडकविण्याचं काम कुणी करू नये- उद्धव ठाकरे

राजकारणासाठी मराठा समाजाला भडकविण्याचं आणि आगी लावण्याचं काम कुणी करू नये, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना स्पष्ट शब्दांत खडसावलं.

Maratha Reservation: मराठा समाजाला भडकविण्याचं काम कुणी करू नये- उद्धव ठाकरे
SHARES

मराठा समाजाच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी सरकार तसूभरही मागे हटणार नाही. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जे जे काही करता येईल ते सर्व करू. यासंदर्भात आम्ही सर्व संबंधितांनाही विश्वासात घेऊन, त्यांच्या सूचनांचा विचार करणार आहोत. विरोधी पक्ष नेत्यांशी देखील या विषयावर सविस्तर बोलण्यात येईल. सरकार याप्रश्नी सुरुवातीपासून प्रामाणिक आहे आणि तळमळीने हा प्रश्न सोडवू इच्छिते. मात्र राजकारणासाठी मराठा समाजाला भडकविण्याचं आणि आगी लावण्याचं काम कुणी करू नये, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना स्पष्ट शब्दांत खडसावलं. (Maharashtra cm uddhav thackeray slams opposition  party leaders on maratha reservation)

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर वर्षा निवासस्थानी बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण लागू करण्याचा कायदा विधानमंडळात संमत झाला तेव्हा त्यामागे सर्व पक्ष होते. एकमताने हा निर्णय झालेला होता. उच्च न्यायालयात देखील आपला विजय झाला, त्यावेळीही आपले अधिवक्ता, वकील ही सगळी पहिल्या सरकारने नेमलेली टीम कायम होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारचे हे प्रकरण घटनापीठाकडे पाठविण्याचं म्हणणे एकीकडे मान्य केलं आहे, तर दुसरीकडे नोकऱ्या, प्रवेशाला स्थगिती दिली आहे. 

हेही वाचा - Maratha Reservation: सरकारला मराठा आरक्षण कायम राखता आलं असतं, पण…

वास्तविक पाहता इतर राज्यांतही आरक्षणाच्या बाबतीतल्या प्रकरणांमध्ये स्थगिती नाही. पण केंद्राने देखील यात आपली भूमिका घ्यायला हवी असं मला वाटतं. या प्रश्नी लोकसभेतही आवाज उठवला जाईल तसंच पंतप्रधानांनी देखील लक्ष घालावं, अशी विनंती करण्यात येईल. केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर ज्या-ज्या राज्यांत आरक्षणाचे प्रश्न आहेत ते समाज या देशाचेच नागरिक आहेत. त्यामुळे निश्चितपणे पंतप्रधानांनी यामध्ये लक्ष घालणं आवश्यक आहे, अशी अपेक्षा देखील उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

मराठा समाज हा लढवय्या आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे त्यांच्या भावना मी समजून घेऊ शकतो. मात्र तुमच्या ज्या भावना आहेत, त्याच माझ्या आणि सरकारच्या आहेत हे लक्षात घ्या. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आम्ही सातत्याने विधिज्ञ, अभ्यासक यांच्याशी बोलत आहोत. लवकरच विरोधी पक्ष नेते यांच्याशी देखील बैठक आयोजित करून या प्रश्नी त्यांची सूचनाही ऐकून घेतली जाईल. मी यासंदर्भांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी बोललो आहे. सारथी संस्थेच्या माध्यमातून आपल्याला विद्यार्थ्यांसाठी काही करता येईल का, किंवा अध्यादेश काढता येईल का अशा अनेक पर्यायांवर आम्ही बोलत आहोत. मात्र ही न्यायालयीन लढाई आपण सर्व निश्चितपणे जिंकल्याशिवाय राहणार नाही, असं स्पष्ट करून या प्रकरणाचा फायदा कुणी राजकारणासाठी करून समाजाची माथी भडकावीत असतील तर ते सहन केलं जाणार नाही. आपण विचलित न होता, संयमाने आणि शांततेने यातून मार्ग काढू आणि महत्त्वाचं म्हणजे आपली एकजूट ठेवू, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा